पुणे : ‘अजितदादा नाहीयेत. त्याचा आपापल्या पद्धतीने आपापल्या राजकारणासाठी कोणी वापर करू नये, सत्य काय ते लवकरच समजेल. मुख्यमंत्री या प्रकरणात स्वत: लक्ष घालत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्यातील डेटाचे विश्लेषण होईल आणि त्यानंतर अहवाल येईल. आता रोहित पवार आणि इतरांना बोलायचे स्वातंत्र्य आहे. शेवटी, त्यांचे काही म्हणणे असल्यास ते मांडतील,’ असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी सांगितले.

‘अजितदादांसारखा मोठा नेता गेला. राज्याचे मोठे नुकसान झाले. पुणे जिल्ह्याचे नुकसान झाले. आज आपण सगळेच त्या दुःखात आहोत. कृपा करून, अशा दुःखद प्रसंगाचे राजकारण करू नये. मी कोणाचे नाव घेत नाही. मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून जे काय घडतंय, कोणीही काहीही बोलते आहे. चौकशी होईल, अहवाल येतील. त्यानंतर बोला; पण आता या विषयावर कोणीही बोलू नका,’ असे आवाहनही त्यांनी केले.

वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट (वॅमनीकॉम) च्या पदवीदान समारंभानंतर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कार्यक्रमाला राष्ट्रीय सहकार विकास परिषदेच्या सचिव मीनू शुक्ला पाठक उपस्थित होत्या.

मोहोळ म्हणाले, ‘निवडणुका येतात आणि जातात. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या सर्व सभा रद्द केल्या. राजकारण करायला आयुष्य पडलंय. पुणे जिल्ह्याचा प्रभारी म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती. पण, मी जिल्ह्यातील कोणत्याही जिल्हा परिषद गट किंवा पंचायत समितीच्या गणात प्रचाराला गेलो नाही. निवडणुका होत राहतील. मात्र, अशा वेळेला कुठेतरी जाऊन प्रचार करणे, योग्य वाटत नाही. शेवटी, निवडणूक म्हणजे युद्ध असते. त्यात आपण काय चांगले काम करतो, समोरचा कसे चांगले करू शकत नाही, साधारणपणे याच्यावर प्रत्येकजण बोलतो. पण, मला तेही करायचे नव्हते.’

‘गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. पक्ष म्हणून आमच्याही सर्व कार्यकर्त्यांनी, स्थानिक नेत्यांनी चांगले काम केले. ते लोकांपर्यंत पोहोचले आहेत. शेवटी, मतदार सुज्ञ आहेत. आज मतदान होईल आणि निकाल लागल्यावर सर्व चित्र स्पष्ट कळेल,’ असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, संसदेतील गदारोळाकडे लक्ष वेधले असता मोहोळ म्हणाले,‘राहुल गांधी जे करत आहेत. त्याचा भाजपला फायदाच होतो आहे. त्यामुळे त्यांना मी शुभेच्छा देतो.’