पुणे : ‘आमदार रोहित पवार यांनी पाठवलेल्या विद्यार्थी शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावणेतीन तासांचा वेळ दिला. विद्यार्थ्यांच्या सगळ्या मान्य केल्या. त्यावर या शिष्टमंडळानेही समाधान व्यक्त करत आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र रोहित पवारांनी आंदोलन सुरुच ठेवले. ते विद्यार्थ्यांना पुढे करून राजकारण करत आहेत,’ अशी टीका भाजपचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी केली.
‘या आंदोलनाला आता काँग्रेसच्या अधिवेशनाचे स्वरूप आले असून, तिथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत केवळ काँग्रेसचेच नेते येत आहेत, भाषणे करत आहेत. हे नेते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. विद्यार्थीशक्तीचा वापर करून कोणी राजकीय आपली पोळी भाजतंय का, याचा विचार आता विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी करायला हवा,’ असेही त्यांनी नमूद केले.
गेल्या चार दिवसांपासून पुण्यात राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची हकालपट्टी आणि विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.
मोहोळ म्हणाले, ‘‘एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांशी वेळोवेळी संवाद साधला आहे. आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेण्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. विद्यार्थ्यांच्या इतर सर्व मागण्या यापूर्वीच मान्य करण्यात आल्या आहेत. त्यावर आमदार रोहित पवार यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळातील विद्यार्थ्यांनीही समाधान व्यक्त करत आंदोलन स्थगित करणार असल्याचे सांगितले होते. असे असताना गेले चार दिवसांपासून सुरु असलेले हे आंदोलन कशासाठी? रोहित पवारांना आपल्याच शिष्टमंडळावर विश्वास नाही का?’
‘तोडगा काढण्यासाठी सकारात्म प्रयत्न’
‘पुण्यातील तिन्ही ठिकाणांवर करण्यात येत असलेल्या आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून, विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यात आला आहे. व्यवस्था नीट झाली पाहिजे, पारदर्शक झाली पाहिजे, विद्यार्थ्यांना विश्वास मिळाला पाहिजे की, आता आमच्या भविष्याची कोणीही खेळू शकणार नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांनीही या सगळ्या विषयावर तातडीने कारवाई झाली. आरोपींना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी सुरू असून, परिक्षा पद्धतीतील सुधारांसाठी कृती दलाचीही स्थापना करण्यात आली आहे,’ असेही मोहळ यांनी सांगितले.
‘आता आंदोलन थांबवा’
‘‘एमपीएससीची तयारी करणारी ही मुलं अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून, गरिबीतून आलेली असतात. हे विद्यार्थी गाव-खेड्यातून पुण्यात अभ्यासासाठी आले आहेत. त्यांची भावना समजू शकतो. त्यांचे कष्ट वाया जाणार नाहीत. विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा राज्य सरकारला घेता येत नाही. त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. पण, हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विषय होऊ शकतो का? आता आमदार रोहित पवार यांच्यासह सर्वच आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता हे आंदोलन स्थगित केले पाहिजे,’ अशी सादही मुरलीधर मोहोळ यांनी आंदोलकांना घातली.
