सांगवडे येथे राजकीय वादातून एकाची निर्घृण हत्या | Loksatta

सांगवडे येथे राजकीय वादातून एकाची निर्घृण हत्या

मृत नवनाथ लिम्हण हे भाजपचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर येत आहे

सांगवडे येथे राजकीय वादातून एकाची निर्घृण हत्या
अनिकेतच्या नातेवाईकानी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येते.

सांगवडे (ता. मावळ, जि. पुणे) गावात एका इसमाची लाकडी दांडक्याने मारहाण आणि तलवारीने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. नवनाथ लिम्हण (वय ३२, रा.सांगवडे, ता.मावळ) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि.२२) रात्रीच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, भैरवनाथ मंदिरात कीर्तन सुरु असताना, मंदिरा लगत रात्री सव्वा बाराच्या सुमारास ही हत्या करण्यात आली. हत्या करणारे ४ ते ५ अज्ञात फरार झाले असून तळेगाव दाभाडे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नवनाथ लिम्हण यांच्यावर तलवारीने वार आणि लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय असून याला राजकीय जोड असण्याची शक्यता आहे. तसेच नवनाथ अर्जुन लिम्हण हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हत्या झालेल्या नवनाथ यांची पत्नी ही सांगवडे गावच्या विद्यमान सरपंच आहेत. हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीची पत्नी ही माजी सरपंच असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. याप्रकरणी काही संशयित ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच तळेगाव दाभाडे पोलिसांत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-04-2017 at 10:48 IST
Next Story
न्यायपालिकांवर राजकीय हस्तक्षेप वाढला