पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील लवासा रस्त्यावर एक थरारक घटना घडली आहे. दुचाकीला वाट न दिल्याच्या कारणातून तीन जणांनी दुचाकीस्वारासह सहप्रवाशाला बेदम मारहाण केली आहे. या बेदम मारहाणीत दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

सुभाष विठ्ठल वाघमारे (वय ३८, रा. तुंगी, ता. मावळ, जि. पुणे) असं बेदम मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार राजेश अंकुश कुवर (वय ३१, सध्या रा. रामनगर, भुशी, लोणावळा, मूळ रा. हरचे, ता. लांजा, जि. रत्नागिरी) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार कुवर आणि वाघमारे मुळशी तालुक्यातील उरवडे ते लवासा रस्त्यावरून जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांना वाट न दिल्याने तिघांनी दुचाकीस्वार कुवर आणि वाघमारे यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

हा वाद वाढत गेल्यानंतर तिघांनी कुवर आणि वाघमारे यांना मारहाण केली. या बेदम मारहाणीत वाघमारे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर मारहाण करणारे तिघे आरोपी दुचाकीवरुन पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पौड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत जाधव करत आहेत.