राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भोर-वेल्हा-मुळशी तालुका प्रमुख विजय मिरघे यांची बुधवारी रात्री बाराच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी निर्घृण हत्या केली.
माताळवाडी परिसरात दहा ते बारा अज्ञांतांनी तीक्ष्ण शस्त्रांनी वार करून मिरघे यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पौड पोलिस ठाण्यात अज्ञांतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरघे हे भूगाव परिसरात राहतात. बुधवारी रात्री बाराच्या सुमारास ते घरी परतत असतान १० ते १२ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्रांनी वार करण्यात आले. या घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले. परिसरातील नागरिकांनी मिरघे यांना रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आला आहे. पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी ससून रुग्णालयात गर्दी केली आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
