पुणे : ‘महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना नाकारले आणि घरचा रस्ता दाखवला, तेच आज रस्त्यावर उतरले आहेत,’ अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चावर टीका केली. ‘‘एसआयआर’ ही प्रक्रिया पहिल्यांदाच होत नसून आतापर्यंत सुमारे १३ वेळा झाली आहे. आता १४व्या वेळी ही प्रक्रिया सुरू आहे. हा निर्णय सरकारचा नसून निवडणूक आयोगाचा आहे,’ असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

गेल्या चार दिवसांपासून पुण्यात राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची हकालपट्टी आणि विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ‘विरोधकांकडे सध्या कोणताही मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे एसआयआरचा विषय पुढे करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहेत. एसआयआरला महाराष्ट्रात विरोध होत असेल तर केरळ, तेलंगणा, झारखंड आणि कर्नाटकात का होत नाही?’ असा सवालही मोहोळ यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासकामांमुळे महाराष्ट्रातील जनता समाधानी असून, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात वेगवान विकास सुरू आहे.’

ठाकरे बंधूंच्या मोर्चात संविधानाच्या प्रती घेऊन सहभागी झालेल्या आंदोलकांवरही मोहोळ यांनी निशाणा साधला. ‘संविधानाच्या निर्मितीतून निर्माण झालेल्या न्यायव्यवस्थेवर, निवडणूक आयोगावर किंवा स्वायत्त संस्थांवर विश्वास नसेल, तर संविधानाचा आदर करण्याचा दावा कसा करता?’ असा सवाल मोहोळ यांनी उपस्थित केला. दरम्यान, मुंबईत आज ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा आयोजित करण्यात आला होता. निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू आक्रमक झाले आहेत. गेल्या काही वर्षांतील निवडणूक आयोगाच्या गोंधळाच्या कारभारावर आक्षेप घेण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची प्रमुख मागणी ठाकरे बंधूंनी केली आहे.