Murlidhar Mohol On Pune Mayor : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं, तर शिवसेना (शिंदे), शिवसेना (ठाकरे), दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागलं. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता पुणेकरांना महापौर कधी मिळणार? पुण्याच्या महापौरपदी आणि उपमहापौरपदी कोणाची वर्णी लागणार? याबाबत अनेक नावे चर्चेत आहेत.

पुण्याच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी अनेक नेत्यांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे पुण्याचा महापौर कोण होणार? याकडे पुणेकरांचं लक्ष लागलेलं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तथा मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत सूचक भाष्य केलं आहे.

पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदांची निवडणूक ६ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?

पुणे महापालिकेची निवडणूक पार पडली आहे. पण अद्याप पुणे महापालिकेचा गटनेता निवडलेला नाही, भाजपाचा गटनेता कधी निवडला जाणार? या प्रश्नावर बोलताना मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “त्यासाठी एक प्रक्रिया असते. मतदानानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महापौर निवडीसाठी एक प्रक्रिया असते. महापौर आणि उपमहापौर निवडीच्या आधी प्रशासनाला ७ दिवस एक नोटीस प्रसिद्ध करावी लागते. माझ्या माहितीनुसार, महापालिकेच्या नगरसचिवांनी ६ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे.”

“आता आमचा गटनेता दोन दिवसांत निवडला जाईल. त्यानंतर महापौर पदाची निवडणूक ६ फेब्रुवारीला होईल. ३० जानेवारीला महापौर आणि उपमहापौर पदाचे आमचे उमेदवार जाहीर होतील आणि त्याच दिवशी महापौर पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले जातील”, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. तसेच “आम्ही पुणेकरांना शब्द दिलेला आहे, त्यामुळे जे विकासाचे कामं करायचे ते चांगलेच करू. प्रशासनाला बरोबर घेऊन पुण्याच्या विकासाचे कामे आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू”, असंही मोहोळ यांनी म्हटलं आहे.