पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी संध्याकाळी थंडावल्या. महायुतीच्या माध्यमातून राज्यात सत्ताधारी मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उघडलेल्या मोहीमेमुळे निवडणूक प्रचारात रंगत आली. केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार काम करत आहे.
कोट्यवधी रुपयांचा निधी विविध योजनांच्या माध्यमातून महापालिकेला दिला जात आहे. मात्र महापालिकेत सत्ताधारी म्हणून काम करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विकासाची कामे केली नसल्याचा आरोप करत महापालिकेतील कारभारी बदला, अशी साद उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणेकरांना घातली आहे.
शहरातील कारभारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी सभागृह नेते गणेश बीडकर, आमदार हेमंत रासने यांच्यावर देखील पवार यांनी निवडणूक प्रचाराच्चा काळात टीका करत महापालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे द्यावी, अशी मागणी केली. निवडणूक प्रचाराची सांगता झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतमध्ये महापालिका निवडणुकीत बहुमतासह भाजपचाच महापौर होईल, निवडणूक निकालानंतर कोणत्याही अन्य पक्षासोबत जाणार नाही,’ असा ठाम विश्वास केंद्रीय राज्यमंत्री आणि निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. महापालिकेत १२० ते १२५ जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला.
महापालिका निवडणुकीची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने झाली. त्यानंतर निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी असलेल्या राज्यमंत्री मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराची माहिती दिली. भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे यावेळी उपस्थित होते.
‘भाजपने संपूर्ण प्रचारकाळात विकासकेंद्रित मुद्द्यांवर भर दिला. प्रचाराची कोठेही पातळी न घसरवता सकारात्मक योजनांसह मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्याने २०१७ नंतर पुण्यात विकासाला गती मिळाली. मेट्रोचे काम देशात सर्वाधिक वेगाने पुणे शहरात सुरू आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारची भक्कम साथ आगामी काळात मिळणार असून पुणेकर विकासाला प्राधान्य देतील,’ असेही मोहोळ म्हणाले.
‘निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतला. आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनीही प्रचार केला. शहरातील २७ प्रभागांत रॅली काढत प्रचार केला. एका दिवसात सुमारे तीन लाख घरांपर्यंत संपर्क साधण्यात आला. पारंपरिक प्रचारासोबत सोशल मीडियाचा आधुनिक पद्धतीने वापर करण्यात आला,’ असे मोहोळ यांनी सांगितले.
‘शांतीत क्रांती करणारा…’
पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देत अंगावर घेतले. पुणे शहरात तुम्ही उपमुख्यमंत्री पवार यांना अंगावर का घेतले नाही, या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘आमदार महेश लांडगे आणि मी दोघे पैलवान असलो, तरी मी नुरा कुस्ती करत नाही. मी शांतीत क्रांती करणारा आहे. महेश लांडगे यांचा स्वभाव वेगळा आहे.’
