पुणे : आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे जागतिक पातळीवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे इंधनाचे दरही वाढत आहे. जागतिक स्तरावर हे संकट असले तरी, देशातील इंधनासह अन्य आर्थिक परिस्थिती आणि महागाई नियंत्रणात आहे, असा दावा केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला.

दरम्यान, शहर विस्तारत असताना गुन्हेगारी शंभर टक्के संपणार नाही. यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी आकडेवारी दिली आहे. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत भाजपची सत्ता असल्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे ही भाजपची जबाबदारी आहे, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या तपपूर्तीनिमित्त शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहर कार्यालयात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोहोळ यांनी हा दावा केला. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न नाना काटे, पुणे जिल्हा ग्रामीणचे (उत्तर) जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा ग्रामीणचे (दक्षिण) जिल्हाध्यक्ष शेखर वढणे या वेळी उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, ‘आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे देशातील इंधनाचे दर वाढत आहेत. मात्र, अन्य राष्ट्रामधील इंधनाचा विचार केला तर देशातील इंधन दर नियंत्रणात आहेत. युद्धामुळे जागतिक पातळीवर संकट ओढावले आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती चांगली आहे.’
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबात विचारणा केली असता मोहोळ म्हणाले,‘ शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी शंभर टक्के संपुष्टात येईल, असे म्हणता येणार नाही. गुन्हेगारी संदर्भातील स्पष्टीकरण पोलीस आयुक्तांनीही दिले आहे. शहरातील गुन्हेगारी नियंत्रित ठेवावी लागणार आहे. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी भाजपचीच आहे.

दरम्यान, ‘२०१४ मध्ये देशातील जनतेने भाजप आणि एनडीए आघाडीवर विश्वास ठेवून स्पष्ट बहुमताची सत्ता दिली. ‘सबका साथ, सबका विकास’ आणि सबका विश्वास’ या महामंत्रामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग १२ वर्षे देशाच्या सर्वोच्च पदावर कार्यरत राहिले. पंतप्रधानपदावर राहण्याचा हा ऐतिहासिक विक्रम मोदी यांनी केवळ जनतेच्या अतूट विश्वासाच्या बळावर केला आहे. गेल्या १२ वर्षांत सरकारने केलेली विकासकामे घेऊनच भाजप जनतेपुढे जाणार आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दीनिमित्ताने २०४७ मध्ये जो विकसित भारत निर्माण होणार आहे, त्याचा अत्यंत मजबूत आणि भक्कम पाया गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केला आहे. देशाने जागतिक स्तरावर आपले स्थान अत्यंत भक्कम केले आहे,’ असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.