पिंपरी : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची युती झाल्यानंतर आता शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काॅंंग्रेस (शरद पवार), काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे चार पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढणार आहेत. नगर परिषदेच्या १४ प्रभागांतील २८ जागांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठीदेखील उमेदवार देणार असल्याचे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जाहीर केले.
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे निरीक्षक भरत भोते, तळेगाव दाभाडे शहरप्रमुख शंकर भेगडे, युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल वाळुंज, राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मनसेचे समन्वयक सचिन भांडवलकर, सतीश गरुड, प्रदीप शिंदे, किरण मोकाशी या वेळी उपस्थित होते. लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
तळेगावमध्ये राष्ट्रवादी काॅंंग्रेस (अजित पवार) आणि भाजप महायुती म्हणून लढणार आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद भाजपकडे आणि दुसऱ्या अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे राहणार आहे. या पक्षाने नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आता महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊन चार दिवस उलटले, तरी अद्याप एकानेही अर्ज दाखल केला नाही. अर्ज भरण्यासाठी १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची युती झाली असल्याचे आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडे यांनी जाहीर केले आहे. नगराध्यक्षपदाचे युतीचे उमेदवार म्हणून भाजपचे संतोष दाभाडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने पुढील अडीच वर्षासाठी गणेश काकडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस १७ आणि भाजप ११ जागा लढविणार
नगरसेवकांच्या २८ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष १७ जागांवर निवडणूक लढविणार आहे. भाजपला ११ जागा दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने अद्याप एकही उमेदवार जाहीर केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच घड्याळ चिन्हावर नगरपरिषद निवडणूक लढविणार असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.
