पुणे : देशातील उच्च शिक्षण संस्थांना ‘नॅक’ मूल्यांकन बंधनकारक असूनही आतापर्यंत देशातील केवळ १६ टक्के महाविद्यालये आणि ४० टक्के विद्यापीठांचेच मूल्यांकन झाले आहे. उर्वरित शिक्षण संस्थांना प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी मूल्यांकन प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान करून नवी रचना लागू करण्यात येत आहे. आता विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष यश, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी अशा निष्पत्तीआधारित पद्धतीने मूल्यमापन केले जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेच्या (नॅक) कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष प्रा. नागेश्वर राव यांनी दिली.

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित आशिया-पॅसिफिक गुणवत्ता नेटवर्क (एपीक्यूएन) शैक्षणिक परिषदेच्या उद्‌घाटनावेळी डॉ. राव बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ‘सिंबायोसिस’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, एपीक्यूएनच्या अध्यक्षा डॉ. गॅलिना मोटोव्हा, विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण या वेळी उपस्थित होते.

डॉ. राव म्हणाले, ‘एक विदा एक देश धोरणाअंतर्गत केंद्रीय माहितीचा वापर करून नॅक मूल्यांकन प्रक्रिया अधिक पारदर्शक, विश्वासार्ह करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन केवळ पायाभूत सुविधांवर नव्हे, तर प्रत्यक्ष शैक्षणिक परिणामांवर आधारित असले पाहिजे. पूर्वीच्या प्रक्रियेत ६० टक्के भर संस्थांमधील भौतिक सुविधा आणि पायाभूत घटकांवर होता. मात्र, मोठे परिसर आणि अत्याधुनिक सुविधा म्हणजेच दर्जेदार शिक्षण असे नाही. विद्यार्थ्यांची कामगिरी हा शिक्षणाच्या गुणवत्तेचा खरा निकष आहे. विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता, कौशल्य, जीवनातील सकारात्मक बदल अशा प्रश्नांच्या आधारे मूल्यांकन झाले पाहिजे. संस्थांनी संगणकीय शिक्षण, कौशल्य विकास आणि प्रत्यक्ष कामातून प्रशिक्षण देणाऱ्या योजनांचा प्रभावी वापर केला पाहिजे. उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सातत्यपूर्ण सुधारणा आवश्यक आहेत.

विद्यार्थी आणि त्यांचे भविष्य शिक्षणाच्या केंद्रस्थानी असले पाहिजे. विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना ज्ञान, व्यावहारिक कौशल्ये आणि स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता दिली पाहिजे. त्यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षकांना सातत्याने नवनवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी,विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्यही महत्त्वाचे आहे. – चंद्रकांत पाटील, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री