‘जय जवान जय किसान’ या सामाजिक उपक्रमांतर्गत नाना पाटेकर यांचे प्रतिपादन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दात्यांच्या मोठय़ा मनामुळेच नाम फाउंडेशनचे कार्य उभे राहिले आहे. समाज म्हणून आपले काही देणे लागते. त्यामुळे मी समाजाला काहीच देत नसून समाजाचीच ठेव परत करतोय, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.

नाम फाउंडेशनच्यावतीने ‘जय जवान जय किसान’ या सामाजिक उपक्रमांतर्गत आयोजित कृतज्ञता सोहळ्यात पाटेकर बोलत होते. अभिनेता मकरंद अनासपुरे, परमवीर चक्र विजेते योगेंद्रसिंह यादव, सैनिक कल्याण विभागाचे कर्नल (निवृत्त) सुहास जतकर या वेळी उपस्थित होते. या उपक्रमामध्ये वीस शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतनिधी प्रदान करण्यात आला. या उपक्रमात महाराष्ट्राबरोबरच देशभरातील शहीद कुटुंबियांना मदतनिधी देण्यात येणार आहे.नामचे कार्य पोस्टमनसारखे आहे असे सांगून पाटेकर म्हणाले, ‘‘सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला केवळ आर्थिक मदत देऊन भागणार नाही. जवानांच्या मुलांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी देखील असंख्य अडचणी आहेत. या कुटुंबांना आर्थिक हातभाराबरोबरच सामाजिक मदतही अपेक्षित आहे. अधिकाधिक तरुणांना समाजकार्यात सहभागी करुन घेण्यासाठी मकरंद अनासपुरे यांच्यासह महाविद्यालयात जाऊन मी तरुणाईशी संवाद साधणार आहे.’’ शाळेत प्रवेश घेण्यासाठी जवानांच्या मुलांना जाचक अटी लावल्या जातात.

या अटी दूर करुन त्यांना सहज प्रवेश देण्यात यावा, यासाठी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. तसेच अरुणाचल प्रदेश, मेघालय या राज्यात फाउंडेशनच्या माध्यमातून जवानांच्या मुलांसाठी शाळा बांधण्यात येणार असल्याचीही माहिती पाटेकर यांनी दिली. अशा उपक्रमांसाठी हातभार लावण्याचे मला व्यसनच जडले असून आपणही यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

‘देशाच्या प्रत्येक नागरिकाला देशाचा गर्व आणि अभिमान असेल तर कोणाला देशसेवेसाठी उद्युक्त करण्याची गरज नाही’, असे सांगून यादव यांनी भारत-पाकिस्तान युद्धातील ऑपरेशन विजय आणि टायगर हिलवरील अनुभव कथन केला.जतकर म्हणाले, ‘‘समाजात लष्करी जवानांविषयी असणारे गैरसमज दूर होण्याची गरज असून त्यांना निवृत्तीनंतर समाजात सन्मानाची वागणूक मिळायला हवी.’’

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naam foundation donate money to families of 20 martyred soldiers
First published on: 12-04-2017 at 01:58 IST