पुणे : भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या (झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) शास्त्रज्ञांनी नागालँडमधील धबधब्यातील बेडकाची नवी प्रजाती शोधली आहे. ‘अमोलॉप्स कमल’ असे या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. जैवविविधतेचा हॉटस्पॉट मानल्या जाणाऱ्या ईशान्य भारतातील वैविध्यपूर्ण आणि अपरिचित प्राणिजीवन या संशोधनातून अधोरेखित झाले आहे.
संशोधक पथकामध्ये डॉ. भास्कर सैकिया, डॉ. विक्रमजित सिन्हा, डॉ. शबनम अन्सारी, डॉ. प्रबीर नारायण कोनवार, डॉ. मृदुल कुमार बोरठाकूर आणि डॉ. के. पी. दिनेश यांचा समावेश होता. या संशोधनाचा शोधनिबंध ‘रेकॉर्ड्स ऑफ द झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’च्या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. शिलाँग येथील भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या शास्त्रज्ञांना नागालँडमधील किफिरे जिल्ह्यातील सिंगरेप गावाजवळील डोंगराळ भागातील अधिवासात बेडकाची नवी प्रजाती आढळली. त्यानंतर या प्रजातीच्या नमुन्यांचे भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या पुण्यातील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने रेण्वीय वंशविकासविषयक (मॉलेक्युलर इव्होल्यूशन) अभ्यास, एकात्मिक वर्गीकरणात्मक विश्लेषण करण्यात आले. त्यात ही प्रजाती ‘अमोलॉप्स इंडोबर्मनेन्सिस’ प्रजाती समूहातील एका स्वतंत्र उत्क्रांतिजन्य वंशातील असल्याचे स्पष्ट झाले.
सर्वेक्षणात सहभागी झालेले शास्त्रज्ञ डॉ. विक्रमजित सिन्हा म्हणाले, ‘नागालँडमधील डोंगराळ भागात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या अधिवासात हा बेडूक आढळला. या प्रदेशातील दुर्गम भूप्रदेश, एकाकी जलप्रवाहांच्या परिसंस्था अजूनही अनेक अल्पपरिचित उभयचर वंशांना आश्रय देत आहेत.’
पुण्यातील डॉ. के. पी. दिनेश यांनी उभयचरांच्या वर्गीकरणामध्ये रेण्वीय पद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. विशेषतः ईशान्य भारतात बेडकांच्या अनेक प्रजाती आकारवैशिष्ट्यांच्या दृष्टीने खूप समान दिसतात. त्यामुळे रेण्वीय पद्धतींची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. प्रजातींच्या सीमा अचूकपणे निश्चित करणे, त्यांचे अस्तित्त्व समजून घेणे, एकाच प्रजातीच्या नावाखाली लपून राहू शकणाऱ्या गुप्त प्रजाती समूहांची ओळख पटवणे या दृष्टीने रेण्वीय माहिती अधिकाधिक आवश्यक ठरत आहे. पूर्वी व्यापक प्रमाणात आढळणारी प्रजाती म्हणून ओळख असलेली ‘अमोलॉप्स इंडोबर्मेन्सिस’ प्रत्यक्षात ईशान्य भारत आणि शेजारील प्रदेशांतील अनेक स्वतंत्र उत्क्रांतिजन्य वंशाचे प्रतिनिधित्व करत असू शकते. जगातील सर्वांत महत्त्वाच्या जैवविविधता हॉट स्पॉटपैकी एका प्रदेशातील उभयचर वैविध्य समजून घेण्यासाठी एकात्मिक वर्गीकरणशास्त्राचे महत्त्व यानिमित्ताने अधिक स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.
भारताची जैवविविधता समजून घेण्यासाठी, संवर्धनासाठी प्राणिजीवनाचा सातत्यपूर्ण शोध, वैज्ञानिक दस्तावेजीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘अमोलॉप्स कमल’ या प्रजातीचा शोध ईशान्य भारतातील समृद्ध, पण तुलनेने कमी अभ्यासलेल्या प्राणिवैविध्याकडे लक्ष वेधणारा आहे. तसेच, जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रदेशांतील दीर्घकालीन क्षेत्रीय सर्वेक्षणांचे महत्त्व अधोरेखित करतो. – डॉ. धृती बॅनर्जी, संचालिका, भारतीय प्राणी सर्वेक्षण
शिक्षकाच्या नावावरून नामकरण
अभ्यासाचे प्रमुख आणि शिलाँग येथील भास्कर सैकिया यांनी या नव्या प्रजातीला त्यांचे शिक्षक आणि मार्गदर्शक डॉ. कमल चौधरी यांचे नाव दिले आहे. आसाममधील बी. बोरुआ महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमाला असताना डॉ. चौधरी यांनी सैकिया यांच्यात प्राणिशास्त्र आणि वर्गीकरणशास्त्राविषयीची आवड रुजवली होती.
