पुणे: उन्हाळा सुरू होताच उष्माघातासारख्या त्रासांसोबतच ‘नागीण’(शिंगल्स) या तीव्र वेदनादायी आजाराचाही विळखा अनेकांना बसतो. सुरुवातीला साधा त्वचारोग वाटणारा हा आजार प्रत्यक्षात खूप वेदनादायी असून वेळेवर योग्य उपचार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र दुर्लक्ष केल्यास दीर्घकालीन वेदना आणि इतर गंभीर गुंतागुंत रुग्णांना भोगावी लागू शकते.
नागीण आजाराला वैद्यकीय भाषेत हर्पिस झॉस्टर असे म्हणतात विषाणूमुळे होणारा आजार असून ज्यांना पूर्वी व्हेरीसोला झॉस्टर अर्थात कांजण्या झालेल्या आहेत. त्यांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. नागीण ही पोटावर,पाठीवर, डोळ्यांजवळ, कमरेवर यासह शरीरातल्या कुठल्याही भागात होऊ शकते. ऍलोपॅथी मध्ये याला नसांच्या मुळाशी असणाऱ्या विषाणूमुळे होणारा आजार असे मानले जाते. तर आयुर्वेदात वात, पित्त, कफ यांच्यातील दोषामुळे हा आजार संभवतो असे मानतात.
ज्यांना लहानपणी कांजण्या झालेल्या असतात. ते विषाणू शरीरातल्या नसांच्या मुळाशी असतात. प्रदीर्घ काळानंतर ते पुन्हा सक्रिय होतात आणि त्यातूनच हा आजार उदभवतो. वास्तविक हा आजार अनेक वेळा पन्नाशीच्या पुढील तसेच मधुमेह रक्तदाब यासारख्या जुन्या व्याधी असणाऱ्यांना होण्याची शक्यता जास्त असते. या आजाराविषयी समाजात अनेक समज गैरसमज असुन यामध्ये महत्वाचा गैरसमज म्हणजे नागीणीचा विळखा पुर्ण झाला किंवा दोन तोंडे जुळली की मृत्यु संभवतो तसेच या आजारावर कुठलेही औषध नसुन हा आजार तंत्रमंत्राने बरा होत असतो. या चुकीच्या कल्पनांमुळेही या आजाराविषयी एक सुप्त भिती असते. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञ याचे खंडन करत हा आजार पुर्ण बरा होण्याविषयी रुग्णांना आश्वस्त करतात.
नागीण आजाराची लक्षणे
हा आजार होण्या होण्याआधी त्या जागेवर वेदना होतात.
डोकेदुखी, ताप येणे ,अंगदुखी, थकवा, यासारखी लक्षणे जाणवणे.
शरीराचा दाह होणे, त्वचा लालसर पडणे, त्वचेवर बारीक दाण्यासारखे लालसर टचटचीत पुरळ येणे, शेवटच्या टप्प्यात या पुरळांचा पुंजका तयार होणे.
आहार कसा असावा?
गीर गाईचे तूप, गीर गाईचे दुध यांचे सेवन, डाळिंब, सफरचंद, मोरावळा, पोट साफ होण्यासाठी काळया मनुका, आहारात मूग वगळता सर्व डाळी वर्ज्य कराव्यात. त्याचप्रमाणे ज्वारी, नाचणी, तांदळाची भाकरी.
काय टाळावे?
मांसाहार, चहा, कॉफी, दही, केळी, पपई, लोणचे, आंबवलेले पदार्थ, पापड, तेलकट पदार्थ आहारात वर्ज्य करावे.
नागीण आजारावर आयुर्वेदाची ही मात्रा काम करते याविषयी वैद्य खडीवाले पेढीचे विनायक परशुराम वैद्य खडीवाले यांनी काही उपचार पद्धती सांगितली. यामध्ये प्रामुख्याने प्रवाळकांडी गोळ्या, कामदुधा गोळ्या, चंदनादिवटी गोळ्या वैद्यांच्या सल्ल्याने घ्याव्यात. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी नागीणचे पुरळ आले आहेत अशा ठिकाणी गीर गाईचे तूप तसेच शतधौतधृत मलम वारंवार लावावे. तसेच उपळसरी पावडर रोज मोठ्यांनी पाण्यात एक चमचा या प्रमाणात घ्यावी तर लहान मुलांनी पाव चमचा घ्यावी यामुळे शरीराला आराम मिळतो. याशिवाय तांदूळ आणि दूर्वा यांचं एकत्रित लेप ज्या ठिकाणी पुरळ आले आहेत त्या ठिकाणी लावावेत. तसेच दुर्वांचा रसही घ्यावा यामुळे त्वरित आग कमी व्हायला मदत होते. – वैद्य विनायक परशुराम खडीवाले
नागीण हा विषाणूजन्य आजार असून तो काही प्रमाणात संसर्गजन्य आजारात मोडतो. बहुतांश वेळा हा उन्हाळ्यात येत असला तरी बाराही महिने हा आजार बळावु शकतो. प्रतिजैविकांमुळे या आजाराला आटोक्यात आणता येऊ शकते. साधारण आठ ते दहा दिवसात या आजाराची तीव्रता कमी करता येते. हा आजार दोन-तीन आठवड्यात बरा झाला तरी देखील काही वेळा याच्या वेदना सहा महिने वर्षभर दीर्घकाळ राहतात. काही रुग्णांमध्ये या आजाराचा विषाणु रकतात गेल्याने मेंदुला सूजही येते. अशावेळी हा आाजार गंभीर स्वरुप धारण करतो. मात्र प्रतिजैविक आणि इतर उपचारांनी रुग्णाला वाचवता येते. हा आजार गंभीर असला तरी ९९ टक्के रुग्ण बरे झाल्याची उदाहरणे आहेत. – डॉक्टर कल्याण गंगवाल
उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने या आजाराची लागण होते. पन्नाशी नंतरचे अनेक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. वर्षभर फारसे या आजाराचे रुग्ण येत नसतात. मात्र उन्हाळ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही या रुग्णांची मे महिन्यात संख्या वाढण्याची शक्यता आहे. – डॉक्टर पुनम राऊत
