पुणे : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच पैकी तीन जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळालेल्या विजयामुळे भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पदवीधर मतदारांनी भाजप आणि महायुतीला नाकारत संविधानिक लोकशाहीच्या रक्षणासाठी कौल दिला आहे. महाविकास आघाडीला मिळविलेला हा विजय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, देशातील उच्चशिक्षित मतदारांनी भाजपच्या राजकारणाविरोधात दिलेला देशव्यापी संदेश आहे, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणूका जिंकण्यासाठी केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपने वेगवेगळ्या पद्धतीने जोर लावला. मात्र महाराष्ट्रातील पदवीधर मतदारांनी जाती-धर्माच्या राजकारणाला बळी न पडता विकास, सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्यांना प्राधान्य दिले आहे. नागपूरमध्ये काँग्रेसचे अभिजीत वंजारी, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या हर्षदा जाधव-देशमुख आणि संभाजीनगरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार( पक्ष) यांनी मिळविलेला हा विजयपुरोगामी विचारांचा विजय आहे, असे तिवारी यांनी सांगितले.
भाजपकडून सत्तेसाठी पक्ष फोडणे, स्वायत्त संस्थांचा गैरवापर करणे आणि लोकशाही संस्थांना कमकुवत करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये विजय मिळविण्यासाठी भाजपने वेगवेगळे प्रयत्न केले. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीच्या निमित्ताने उच्चशिक्षित मतदारांनी दिलेला कौल म्हणजे भाजपच्या सत्ताकारणाला दिलेला राजकीय इशाराच आहे. तात्पुरत्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या लाटेला बळी न पडता मतदारांनी सामाजिक एकोपा आणि तणावमुक्त विकासाची अपेक्षा व्यक्त केली आहे, असेही ते म्हणाले.
शाहू-फुले-आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. संत-महात्म्यांच्या या भूमीत धर्माच्या नावाखाली अधर्माचे राजकारण आणि सत्तेसाठी मनमानी फार काळ चालणार नाही. महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचे पाईकच सत्तेत हवेत, असा स्पष्ट संदेश पदवीधर मतदारांनी दिला आहे. हा निकाल म्हणजे भाजपच्या पराभवाची सुरुवात असल्याचे तिवारी म्हणाले.
पंतप्रधानांच्या विधानावरही साधला निशाणा
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका मतपत्रिकेद्वारे आणि पसंतीक्रमानुसार होतात, एवढी मूलभूत बाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहीत नसावी का? मतपत्रिकेवर मतदान कुठे होते, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या पंतप्रधानांना या निवडणुकांचे स्वरूपही माहीत नसणे ही बौद्धिक दिवाळखोरी म्हणायची का? असा उपरोधिक सवालही तिवारी यांनी केला. भाजपच्या शीर्ष नेतृत्वाच्या प्रभावक्षेत्रातील नागपूरसह झाशी, प्रयागराज, पाटणा, नालंदा आणि गोरखपूर परिसरातील उच्चशिक्षित मतदारांनीही भाजपला नाकारल्याचा दावा त्यांनी केला. मतपत्रिकेवरील मतदान हीच काँग्रेसची भूमिका असून, लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अधिक बळकट झाला पाहिजे, असेही तिवारी यांनी स्पष्ट केले.
