पुणे : नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग मेट्रो मार्गाच्या उभारणीला अखेर गती मिळाली आहे. या मार्गावर महर्षी कर्वे पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. या बाबतचा प्रस्ताव ‘महामेट्रो’ने महापालिकेकडे पाठवला आहे. मात्र, हे उड्डाणपूल महापालिका की महामेट्रो उभारणार, याचा निर्णय अद्याप झालेला नसून, तो लवकरच होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यानंतर या मेट्रो मार्गाच्या उभारणीला लवकरच सुरुवात होणार आहे.

नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग या मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मंजुरी दिली. हा ६.१२ किलोमीटरचा उन्नत मेट्रो मार्ग असून, त्यावर सहा स्थानके असतील. त्यात कर्वे पुतळा, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, वारजे, दौलतनगर आणि माणिकबाग या स्थानकांचा समावेश असेल. या मार्गासह स्थानकांच्या उभारणीसाठी ‘महामेट्रो’ने निविदा काढल्या होत्या. परंतु, या मार्गावर कर्वे पुतळा आणि आंबेडकर चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्याची सूचना महापालिकेने केली होती. या पुलांची रचना आणि आराखडा अखेर अंतिम झाल्याने आता या मेट्रो मार्गाच्या उभारणीतील अडसर दूर होणार आहे.

कर्वे पुतळा आणि आंबेडकर चौक या दोन्ही उड्डाणपुलांसह तेथील मेट्रो मार्गाच्या उभारणीसाठी सुमारे ४०४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा अंदाज २०२१च्या बांधकाम दरांनुसार असून, त्यात आता १० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. हे दोन्ही उड्डाणपूल मेट्रो मार्गाचा भाग असतील. यातील पहिल्या मजल्यावर उड्डाणपूल आणि दुसऱ्या मजल्यावर मेट्रो मार्ग असेल. या उड्डाणपुलांचा आराखडा महामेट्रोने महापालिकेकडे सादर केला आहे. महापालिकेकडून यावर लवकरच अंतिम निर्णय होणे अपेक्षित आहे. या मेट्रो मार्गाच्या उभारणीसाठी ‘महामेट्रो’ने जूनमध्ये निविदा मागविल्या होत्या. या निविदांना ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे उड्डाणपूल उभारण्यास वेळेत मंजुरी मिळाल्यास या वर्षअखेरीस या मार्गाचे काम सुरू होऊ शकते, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली.

महर्षी कर्वे पुतळा उड्डाणपूल
लांबी – १.६ किलोमीटर
ठिकाण – कर्वे रस्त्यावरील हनुमान मंदिर ते डहाणूकर कॉलनीतील हॉटेल मिर्च मसालाजवळ
खर्च – ३२७ कोटी रुपये

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक उड्डाणपूल
लांबी – ५०० मीटर
ठिकाण – डी मार्ट चौक ते कॅनॉल रस्त्याजवळ
खर्च – ७७ कोटी रुपये

नळस्टॉप ते माणिकबाग या मेट्रो मार्गावर कर्वे पुतळा आणि आंबेडकर चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन आहे. याचा आराखडा अंतिम झाला असून, तो महापालिकेकडे सादर करण्यात आला आहे. महापालिकेकडून त्यास मंजुरी मिळाल्यानंतर लवकरात लवकर काम सुरू करण्यात येईल.- अतुल गाडगीळ, संचालक (कार्य), महामेट्रो

‘महामेट्रो’कडून दोन्ही दुमजली उड्डाणपुलांचा आराखडा मिळाला आहे. या आराखड्याचा अभ्यास करण्यात येत आहे. हे दोन्ही उड्डाणपूल महापालिका उभारेल, असा प्रस्ताव आहे. या बाबतचे पत्रही महापालिका आयुक्तांनी ‘महामेट्रो’ला दिले आहे. उड्डाणपूल नेमके कोण उभारणार याचा अंतिम निर्णय दोन ते तीन दिवसांत होईल. – दिनकर गोजारे, मुख्य अभियंता (प्रकल्प), पुणे महापालिका