पिंपरी महापालिकेला विकासकामांसाठी एकापाठोपाठ पुरस्कार प्राप्त होऊ लागल्यानंतर त्याचे संपूर्ण श्रेय घेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.  कायापालट भाजपने केला असून राष्ट्रवादीच्या काळात शहराचा बट्याबोळ झाला होता, यावर भाजपने बोट ठेवले आहे. भाजपाच्या सत्ताकाळात विकासकामे झाली नाहीत, लोकाभिमुख कारभार झाला नाही, असे आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेच ‘आरसा’ दाखवला आहे, अशी टीका भाजपचे माजी सत्तारुढ पक्षेनेते नामदेव ढाके यांनी केली आहे.

पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने २० वर्षे सत्ता भोगली. मात्र, त्यांनी कामेच केली नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी २०१७ मध्ये सत्ता परिवर्तन घडवले. भाजपच्या हातात शहराचा कारभार दिला. त्यानंतर पाचच वर्षात शहराचा कायापालट झाला.

प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरीता भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला स्वांतत्र्य दिले, सकारात्मक निर्णयही घेतले. प्रशासकीय कामकाजामध्ये नवनवीन संकल्पना आणि कार्यपद्धतींचा अंगीकार केला. लोकाभिमुख कार्यालयाचे व्यवस्थापन केले. नागरिकांना ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळेच महापालिकेचे कामकाज राज्यात अव्वल ठरले असून त्यासाठी पालिकेला अनेक पारितोषिके मिळू लागली आहेत, असे ढाके यांनी सांगितले.

भाजपने कोविड काळात शहरवासियांना दिलेली सेवा राज्यात लक्षवेधी ठरली. स्मार्ट सिटीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी नेत्यांनी केला. मात्र, स्मार्ट सिटीतील कामांसाठीच सुरतला (गुजरात) झालेल्या सोहळ्यात पिंपरी-चिंचवडला तीन पारितोषिके मिळाली. स्पर्धेतील ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी बिनबुडाचे आरोप करुन नागरिकांची दिशाभूल करणे थांबवावे आणि आपण सत्तेत असताना काय दिवे लावले, याचे आत्मचिंतन करावे, असा सल्लाही ढाके यांनी दिला आहे.