scorecardresearch

महापालिकेच्या प्रभागांची नावे फुटली?

महापालिका प्रभागांची नावे मंगळवारी (१ फेब्रुवारी) जाहीर होणे अपेक्षित असताना प्रभागांची नावे सोमवारीच दुपारी फुटली.

पुणे : महापालिका प्रभागांची नावे मंगळवारी (१ फेब्रुवारी) जाहीर होणे अपेक्षित असताना प्रभागांची नावे सोमवारीच दुपारी फुटली. महापालिकेच्या संकेतस्थळावरच नावांची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभागांची ती नावे अधिकृत नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नावे ठरवून दिलेल्या कालावधीतच जाहीर होतील, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आणि सीमा मंगळवारी (१ फेब्रुवारी) जाहीर होतील आणि त्यावर हरकती-सूचना मागविण्याची प्रक्रिया लगेच सुरू होईल.

महापालिकेकडून शहरातील प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाला तो सादर करण्यात आला असून राजकीय दबावापोटी त्यामध्ये काही बदल करण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. त्यामुळे प्रभाग रचनेबाबत उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच सोमवारी प्रभागांची नावे फुटली. महापालिकेच्या संकेतस्थळावर नावे टाकण्यात आल्याचे पुढे आल्यानंतर नावे तातडीने संकेतस्थळावरून हटविण्यात आली. मात्र,यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत, असे सांगण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला प्रभाग रचना आराखडा जाहीर करण्यासाठीचा कार्यक्रम दिला आहे. त्यानुसार मंगळवारी प्रभागांची सीमा महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून जाहीर केली जाणार आहे. आगामी निवडणुकीसाठी ५८ प्रभाग असून त्रिसदस्यीय पद्धतीने (तीन नगरसेवकांचा एक प्रभाग) निवडणूक होणार आहे.

प्रभाग आराखडा आज

प्रभागाची सीमा एक फेब्रुवारी रोजी जाहीर झाल्यानंतर याच दिवसापासून १४ फेब्रुवारी पर्यंत प्रारूप प्रभाग रचना आराखडय़ावर हरकती-सूचना देता येणार आहेत. निवडणूक शाखेला प्राप्त झालेल्या हरकती-सूचना १६ फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्या जातील. राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत हरकती आणि सूचनांवर २६ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतली जाईल. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशींबाबतचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाला २ मार्च रोजी पाठविण्यात येणार असून प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Names wards municipal corporation leaked ysh

ताज्या बातम्या