पुणे : ‘आजूबाजूचे भवताल रखरखीत झाले आहे. या भवतालाने आपल्यातील हळवेपणा हिरावून घेतला आहे. याची जाणीवही वेदना देणारी आहे,’ अशी खंत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या वतीने नाना पाटेकर यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक अनंत सामंतलिखित ‘ही चंद्रचुऱ्याची नक्षी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कोहिनूर समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, कवी संदीप खरे, अभिनेत्री नेहा जोशी, विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी, समन्वयक पंकज क्षेमकल्याणी या वेळी उपस्थित होते.

नाना पाटेकर म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या सान्निध्यातच राहतो आहे. त्यामुळे आता शहरात राहावेसे वाटत नाही. शहरातील माणसे, टोलेजंग इमारती आणि मोठ-मोठ्याल्या गाड्यांची आता भीती वाटू लागली आहे.’‘अनंत सामंत यांच्या लेखनात पाहायला मिळणारी निसर्गाची रूपे कल्पनाशक्तीच्या पलीकडची आहेत. या पुस्तकात अनेक वैयक्तिक अनुभव आहेत. हीच त्यांच्या लेखनाची जमेची बाजू आहे,’ असेही पाटेकर यांनी सांगितले. ‘अनंत सामंत यांच्या लेखनाला वैश्वितकेचा गाभा आहे. त्यात संवेदनशीलता आहे. हे पुस्तक वास्तव जीवनालादेखील समृद्ध करणारे आहे,’ असे गौरवोद्गार खरे यांनी काढले.

कृष्णकुमार गोयल म्हणाले,‘एखाद्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा त्या पुस्तकाच्या अभिवाचनाने करावा, ही फारच चांगली कल्पना आहे. पुस्तक हे एक सशक्त माध्यम आहे, हे अनंत सामंत यांच्यासारख्या ताकदीने लिहिणाऱ्या लेखकांमुळे पुन्हा पुन्हा सिध्द होते. त्यांचे ‘एम टी आयवा मारू’ हे पुस्तक आज सुमारे ३७ वर्षे झाली तरीही वाचकांच्या हिट लिस्टवर आहे. ‘ही चंद्रचुऱ्याची नक्षी’ हे त्यांचे नवीन पुस्तक देखील वाचकांना आवडेल, असा मला विश्वास वाटतो.’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी यांनी केले. विदिशा विचार मंचचे समन्वयक नितीन जळूकर यांनी आभार मानले.उत्तरार्धात ‘ही चंद्रचुऱ्याची नक्षी’ या पुस्तकातील निवडक भागांचे अभिवाचन प्रसिद्ध कवी संदीप खरे आणि प्रसिद्ध अभिनेत्री नेहा जोशी यांनी केले.