पुणे : नाना पाटेकर या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. कलेच्या क्षेत्रातील ते मानदंड होतेच, त्याशिवाय सामाजिक पातळीवर एक राजकीयदृष्ट्या सोयीस्कर नसलेले सत्य सांगणारा एक बळकट आवाज होते. नानांचे जाणे हे अनेक अर्थांनी समाजाचा तोटा आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते, लेखक गिरीश कुलकर्णी यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली.
नाना पाटेकर यांच्यबरोबर गिरीश कुलकर्णी यांनी देऊळ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यामुळे नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा देतानाच व्यक्ती, कलावंत म्हणून नाना यांच्याविषयी असलेल्या भावना गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या. कुलकर्णी म्हणाले, नानांचे जाणे हे अनेक अर्थांनी समाजाचा तोटा आहे. व्यक्ती म्हणून माझ्या क्षेत्रातील, माझ्या कलेतील एक मानदंड हरपला. सामाजिक पातळीवर एक राजकीयदृष्ट्या सोयीस्कर नसलेले सत्य सांगणारा एक बळकट आवाज म्हणजे नाना पाटेकर होते.
लोकशाहीच्या धबडग्यात न्यायप्रक्रिया थोडीशी दिरंगाईची होते, तिचा योग्य माणसाकडे अनेकदा काणाडोळा होतो. शेतकरी घटकासाठी त्यांनी उभे केलेले नाम फाऊंडेशनसारखे काम, समाजाचे लक्ष वेधायचा केलेला प्रयत्न हे स्तुत्य होते, आदर्शवत होते. नाना म्हणजे विचारांचे मोहोळ होते. त्यांच्यात तुम्हाला दरवेळी भावतील असे विचार नव्हते. त्यांचा डंख कधी कधी त्रस्त करत असे. पण त्यांनी स्वत:ची ऊर्मी दडपली नाही.
अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास नाना परदेशात असते, तर तिथे त्यांच्या कलेला उठाव देणारे काम घडले असते. दुर्दैवाने, अजूनही आपल्याकडे त्या अर्थाने त्यांच्यातील कलेची, त्यांच्यासारख्या अनवट कलाकाराची किंमत होत नाही. पण टॉम हँक्स, डॅनियल डे लुईस यांच्यासारख्या महानतम अभिनेत्यांसारखे विविधरंगी काम नाना करू शकले असते. अर्थात त्यांनी आजवर मजेशीर काम केले आहे. स्वतःचा स्वतंत्र विचार असणारा माणूस आपल्यातून गेला आहे, अशी माणसे कमी होत आहेत, हा सर्वांत मोठा तोटा आहे.
नानांनी देऊळ चित्रपटात काम केले होते. त्या चित्रपटावेळच्या खूप आठवणी आहेत. देऊळ चित्रपटाची संहिता लिहीत असताना जवळपास सहा महिने रोज नानांना भेटत होतो. ते स्वतः स्वयंपाक करून खाऊ घालायचे. चिकन करण्यात त्यांचा हातखंडा होता. नानांना कवितेची असलेली समज फार दुर्मीळ होती. अनेक कवी त्यांना मुखोद्गत होते. खानोलकर, कुसुमाग्रज, मर्ढेकर, इंदिरा संत अशा कित्येक कवींच्या कविता धडाधड म्हणून दाखवायचे, कवितेचा अर्थ समजावून सांगायचे. एखाद्या प्राध्यापकासमोर, एखाद्या तत्त्वज्ञासमोर बसलो आहे की काय, असे वाटायचे, अशी आठवण गिरीश कुलकर्णी यांनी सांगितली.
नाना पाटेकर या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. त्यामुळे प्रेक्षक म्हणून आम्हीही पुन्हा पुन्हा त्यांच्या प्रेमात पडत राहिलो. आम्हाला ते सातत्याने हवेहवेसे वाटत राहिले. वय जणू वाढतच नाही की काय अशा प्रमाणे त्यांची ऊर्जा, विचारांचा ताजेपणा होता. त्यांचे जाणे चटका लावणारे आहे. या निमित्ताने नाना पाटेकर हे नेमके कोण होते, त्यांच्या काही विचारांपैकी, काही कामांपैकी काहीतरी आमच्यात आणण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी नमूद केले.
