पुणे : अभिनेता असलेले नाना पाटेकर कारगिल युद्धावेळी देशसेवा करण्यासाठी संरक्षणमंत्र्यांच्या शिफारशीने थेट युद्धभूमीवर पोहोचले होते. लष्कराच्या आर्टिलरी रेजिमेंट, इन्फंट्री बटालियन, जलद प्रतिसाद दलामध्ये (क्यूआरटी) त्यांनी काम केले. पूर्ण वेळ गणवेशात राहून नाना पाटेकर लष्करी जवानांमधीलच एक झाले होते.
कारगिल युद्धावेळी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (निवृत्त) कुपवाडा येथे मेजर जनरल म्हणून डिव्हिजनल कमांडर होते. त्यांच्याच डिव्हिजनमध्ये नाना पाटेकर सहभागी झाले होते. कारगिल युद्धादरम्यानची आठवण सांगताना लेफ्टनंट जनरल पाटणकर म्हणाले, ‘कुपवाडा येथे असताना तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचा फोन आला.
फर्नांडिस म्हणाले, ‘आमच्या एका मित्राला यायचे आहे. तो आला तर चालेल का? संरक्षणमंत्रीच विचारत असल्याने मी लगेच होकार दिला. त्यांनी नाना पाटेकर येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर नाना आमच्या कुपवाडा ठाण्यावर पोहोचले. ‘मी इथे आलो आहे, हे माझा स्वीय सहायक वगळता कोणालाही माहीत नाही. त्यामुळे तुमच्याकडूनही माझ्याविषयी कोणाला कळू देऊ नका. मी इथे आल्याची अजिबात प्रसिद्धी होऊ नये,’ असे त्यांनी माझ्याशी बोलताना स्पष्ट सांगितले.
विनंती करून गणवेश मागून घेतला आणि पूर्ण वेळ गणवेशात राहू लागले. त्यांची तंदुरुस्ती उत्तम होती. युद्धस्थिती असल्याने रोज अक्षरश: धुमश्चक्री सुरू होती. नाना पाटेकर यांनी त्या वेळी आर्टिलरी रेजिमेंट, इन्फंट्री बटालियन, ‘क्यूआरटी’मध्ये काम केले. एकदा त्यांनी तोफ चालवण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यानुसार ‘१३० एमएम’ तोफही त्यांनी चालवली. नाना अगदी थेट नियंत्रण रेषेपर्यंत जाऊन आले होते. त्यांनी स्वत: स्वयंपाक करून सर्वांना जेवू घातले होते. काश्मीरमधील जवळपास महिनाभराच्या काळात नाना लष्करातील एक जवान होऊन राहिले. त्यांच्या असण्यामुळे इतर जवानही खूश होते.’
अभिनेता असलेल्या नाना पाटेकर यांनी लष्कराचे कमांडो प्रशिक्षण घेतले होते. प्रादेशिक सैन्यात (टेरिटोरिअल आर्मी) मानद कॅप्टन म्हणून प्रवेश केला होता. कारगिल युद्धावेळी प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन देशसेवेबाबतचा तपशील नाना पाटेकर यांनीही एका मुलाखतीत सांगितला होता. मुलाखतीत नाना म्हणाले होते, ‘त्या वेळी फर्नांडिससाहेब संरक्षणमंत्री होते. मला युद्धात सहभागी व्हायचे होते. माझे कमांडो प्रशिक्षण झाले होते. मी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सहभागी झालो होतो, ३०० मीटरच्या स्पर्धेत मला रौप्यपदकही मिळाले होते. कारगिल युद्धात जाण्याची इच्छा फर्नांडिस यांच्याकडे प्रकट केल्यावर त्यांनी आधी विरोध केला. त्यांना माझ्या लष्करी प्रशिक्षणाची माहिती सांगितल्यावर ते राजी झाले. युद्धकाळात मी सुमारे ३० दिवस काश्मीरमधील कुपवाडा क्षेत्रात राहिलो होतो. गेलो तेव्हा ७६ किलो वजन होते, परतलो तेव्हा ५६ किलो वजन झाले होते.’
‘नानांशी छान मैत्री’
‘युद्धभूमीवरील त्या सहवासामुळे नानांशी छान मैत्री झाली. ते मला मोठ्या भावाप्रमाणे मानत होते. कारगिल युद्धातील योगदानासाठी मला उत्तम युद्ध सेवापदक जाहीर झाले. त्या वेळी फोन करून प्रत्यक्ष कार्यक्रमाला हजर राहण्याची विनंती केली. त्यांच्या इच्छेनुसार व्यवस्था केली आणि ते आवर्जून आलेही होते. नंतरही आमच्या भेटी होत राहिल्या,’ असेही लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांनी सांगितले.
(नानांच्या कारगिल युद्धातील सहभागाबाबत ले. जनरल (नि.) विनायक पाटणकर यांच्या आठवणी.)
