पुणे : भारतीय जनता पक्षाकडे पैसे, समाज माध्यमे असे सगळेच आहे. त्यामुळे ते अगदी देशही विकत घेऊ शकतात. त्यांनी खुशाल सशासारखे धावत पुढे जावे, आम्ही कासव गतीने मात्र जनतेच्या आशीर्वादावर पुढे जाऊ, असा आशावाद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी व्यक्त केला. चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पटोले शनिवारी पुण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी देशाचे पंतप्रधान दोन वेळा प्रचारासाठी येतात. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पोटनिवडणुकांसाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा येतात, यावरून भारतीय जनता पक्षाच्या मनातील धाकधूक स्पष्ट आहे, असेही पटोले या वेळी म्हणाले. पटोले म्हणाले,की बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. पोटनिवडणुकांच्या दृष्टीने ते आमचे ‘स्टार प्रचारक’ आहेत. तांबे कुटुंबातील वाद हा त्यांचा अंतर्गत कौटुंबिक विषय होता. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी त्या प्रकरणात कारवाई केली आहे, त्यामुळे आम्ही कोणी त्यावर भाष्य करणे योग्य नाही. गौतम अदानी यांना काँग्रेसने मोठे केले, असे भारतीय जनता पक्ष म्हणतो. मात्र, तसे असेल तर गेल्या ५० वर्षांत अदानी कुठे होते आणि गेल्या आठ-नऊ वर्षांतच ते प्रकाशझोतात का आले?, असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अदानींबाबत प्रश्न उपस्थित केले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पान टपरीवर बोलत असल्यासारखे भाषण केले. अदानी एवढे सज्जन असतील तर पंतप्रधान काहीच का बोलत नाहीत, अशी विचारणाही पटोले यांनी केली.
मुनगंटीवार यांना टोला..
राहुल गांधी यांना मोदी साहेबांसारखी अक्कल नाही, हे सुधीर मुनगंटीवार यांचे म्हणणे बरोबरच आहे. राहुल गांधी देश जोडण्याचा प्रयत्न करतात. देशाच्या राज्यघटनेचे रक्षण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पंतप्रधान मोदी मात्र राज्यघटना जुमानत नाहीत. हिंदू- मुस्लीमांमध्ये फूट पाडतात. त्यावरून मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील फरक स्पष्ट दिसतो. त्यामुळेच मुनगंटीवारांच्या विधानाशी मी सहमत आहे, असा खोचक टोलाही पटोले यांनी या वेळी लगावला.