जुन्नर : नाणेघाट परिसरात ‘नानाचा अंगठा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोकादायक कड्यावर फिरण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी एका २२ वर्षीय तरुणाचा पाय घसरून खोल दरीत पडल्याने मृत्यू झाला. दोन दिवस शोधमोहीम राबविल्यानंतर मंगळवारी सकाळी मुरबाड येथील सह्यगिरी रेस्क्यू टीमने त्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.

दत्ता लोंढे (वय २२, रा. पारगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. लोंढे हा मित्रांसह नाणेघाट परिसरात पर्यटनासाठी गेला होता. डोंगर चढत असताना अर्ध्या वाटेत लोंढे याने परत जात असल्याचे मित्रांना सांगितले. मात्र, बराच वेळ उलटूनही तो वाहनतळापर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे मित्रांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याचा शोध घेतला. परिसरात शोधाशोध करूनही तो न सापडल्याने जुन्नर पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर पोलिसांचे पथक, आपत्ती व्यवस्थापन विभाग, वन विभाग आणि रेस्क्यू टीमने शोधमोहीम सुरू केली. मात्र, पाऊस आणि दाट धुके यामुळे दरीतील परिसर स्पष्ट दिसत नसल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.

शोधमोहीमेदरम्यान लोंढे याची एक चप्पल दरीकडे घसरल्याच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळे पावसामुळे पाय घसरून तो दरीत कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, आपदामित्र सुशांत भुजबळ तसेच रेस्क्यू टीमचे आदित्य डेरे, शंतनू डेरे यांनी वन विभागाच्या थर्मल ड्रोनच्या सहाय्याने परिसराची पाहणी केली. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे सोमवारी रात्री शोधमोहीम थांबवावी लागली.

मंगळवारी सकाळी मुरबाडच्या दिशेने पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली. दीपक विशे यांच्या नेतृत्वाखाली सह्यगिरी रेस्क्यू टीमचे कुसुम विशे, संदेश गपाट, हेमंत ठोंबरे, रामदास ठोंबरे, मारुती वाघ, हरी लोबी आणि समीर ठोंबरे यांनी सुमारे साडेतीन तास अतिशय कठीण परिस्थितीत प्रयत्न केले. अखेर दरीतून लोंढे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

वन विभागाचे आवाहन

पावसाळ्यात नाणेघाटासह डोंगर-दऱ्यांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी विशेष सावधगिरी बाळगावी. धोकादायक कड्यांवर जाणे टाळावे, सेल्फी किंवा स्टंटच्या मोहापासून दूर राहावे आणि सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी केले आहे.