पिंपरी : पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील नारायणगाव येथील कला केंद्रावर दोन गटात झालेल्या वादातून एका तरुणाने गोळीबार केला. त्यानंतर तो पळून गेला. त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक असून त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
अविनाश लक्ष्मण कोळेकर (३०, चाकण रोड, आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कांदळी गाव येथील कला केंद्रावर ८ ऑगस्ट रोजी किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाला. त्यामध्ये एका गटाने गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केला आणि आरोपी पळून गेले. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील आरोपी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात रहिवासी असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस अंमलदार गणेश सावंत आणि विनोद वीर यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रावसाहेब मोठे, उपनिरीक्षक महेश खांडे, कॉन्स्टेबल हर्षद कदम, गणेश सावंत, विनोद वीर आणि गणेश हिंगे यांच्या पथकाने ११ ऑगस्ट रोजी रोहकाल फाटा चाकण येथून अविनाश कोळेकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कला केंद्रात गोळीबार केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल जप्त केले. शस्त्र बाळगल्या प्रकरणी त्याच्या विरोधात उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात जुन्नर आणि आळंदी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.
बांधकाम व्यवसायाच्या बहाण्याने ११ लाखांची फसवणूक
जगा विकसित करण्यासाठी एकत्रीत डेव्हलपमेंटचा करारनामा करून तब्बल ११ लाख ७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना नोव्हेंबर २०२३ ते ११ ऑगस्ट २०२६ दरम्यान चिंचवड येथे घडली.
याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात एका बांधकाम व्यवसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या मालकीची जागा फिर्यादी व त्यांच्या साथीदारांना एकत्रित डेव्हलप करण्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यासाठी फिर्यादींकडून ऑनलाइन माध्यमातून २७ लाख ५० हजार रुपये स्वतःच्या खात्यावर घेतले. मात्र, करारनाम्याप्रमाणे जागा विकसित न करता व्यवहार रद्द केला. त्यानंतर २५ लाख ५० हजार रुपये परत केले, मात्र उर्वरित १ लाख ५० हजार रुपये आणि नुकसान भरपाईचे ९ लाख ५७ हजार रुपये अशी एकूण ११ लाख ७ हजार रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ८३ लाखांचा गंडा
परदेशी शेअर मार्केट, स्टॉक मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीवर ५०० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला तब्बल ८३ लाख ८० हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना २ फेब्रुवारी २०२६ ते ६ जून २०२६ दरम्यान चिखली येथील शिवतेज नगरमध्ये घडली.याबाबत एका २२ वर्षीय तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांसह विविध बँक खातेधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला एका संकेतस्थळाची लिंक आणि बनावट प्रमाणपत्र पाठवून विश्वास संपादन केला. त्यानंतर परदेशी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास प्रचंड नफा मिळेल असे आमिष दाखवले. फिर्यादीने गुंतवलेल्या रकमेवर मोठा नफा दाखवून तो नफा काढण्यासाठी कन्व्हेंजन फी, फाईलिंग फी, कॅपिटल गेन टॅक्स, सेबी चार्जेस आणि जीएसटी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी ८३ लाख ८० हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर भरण्यास भाग पाडले. रक्कम भरल्यानंतर नफा किंवा मूळ रक्कम काहीही परत न करता आर्थिक फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करत आहेत.
पतीनेच घरातून चोरली ७९ हजारांची रोकड
पत्नी शौचालयात गेल्याची संधी साधून पतीनेच घरात ठेवलेले ७९ हजार ५०० रुपये चोरून नेले. ही घटना मंगळवारी (११ ऑगस्ट) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चिखलीत घडली.या प्रकरणात महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे पती पत्नी आहेत. ते वेगवेगळे राहतात. आरोपी हा आपल्या मुलीला भेटण्याच्या बहाण्याने फिर्यादी पत्नीच्या घरी आला होता. तो मुलीशी बोलत असताना फिर्यादी महिला शौचालयात गेली. पतीने याच वेळेचा फायदा घेतला आणि घरात ठेवलेली ७९ हजार ५०० रुपयांची रोकड पत्नीच्या संमतीशिवाय चोरून पोबारा केला. चिखली पोलीस तपास करत आहेत.
बालविवाह प्रकरणी मंगल कार्यालयाच्या संचालकासह नातेवाइकांवर गुन्हा
कायद्यानुसार लग्नाचे वय भरण्यापूर्वीच एका २० वर्षे ९ महिने वयाच्या मुलाचा विवाह १८ वर्षीय मुलीसोबत लावून दिल्याप्रकरणी मंगल कार्यालयाच्या संचालकासह नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार (८ ऑगस्ट) रोजी दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास आळंदी येथील मंगल कार्यालयात घडली.याबाबत मुलीचे वडिलांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगल कार्यालयाचे संचालक, नवरदेवासह सात जणांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुलाचे वय कायदेशीररित्या २१ वर्षे पूर्ण नसताना फिर्यादी यांच्या १८ वर्षीय मुलीसोबत त्याचा विवाह लावून दिला. बालविवाह होत असल्याचे माहीत असतानाही मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा पार पाडण्यात आला. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
