डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसंदर्भात अद्याप कोणतेही धागेदोरे पोलिसांना मिळालेले नाहीत. पोलिस या घटनेचा सर्व बाजूने तपास करीत आहे. त्यासाठी आठ पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती पुण्याचे पोलिस सहआयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. दाभोलकर यांची मंगळवारी सकाळी पुण्यातील महर्षी शिंदे पूलावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर या संदर्भात माहिती देण्यासाठी पोलिसांनी पत्रकार परिषद बोलावली होती.
पोलिसांना घटनास्थळावरून दोन जिवंत काडतुसे आणि दोन रिकाम्या पुंगळ्या मिळाल्या आहेत. घटनास्थळाच्या परिसरातील आणि आजबाजूच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱयातील चित्रणही तपासण्यात येत आहे, असे सिंघल म्हणाले. हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस सर्व शक्यता गृहीत धरून तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.