पुणे : ‘विकसित भारताच्या निर्मितीत महिला शक्तीचा सक्रिय सहभाग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून, नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या माध्यमातून लोकसभेसह सर्व विधानसभांमध्ये महिला प्रतिनिधित्वाचा आवाज बुलंद होईल,’ असे मत राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी मंगळवारी व्यक्त केले.

‘विकसित भारताला समर्पित असलेले नारी शक्ती वंदन अधिनियम लोकसभेत पूर्ण बहुमताने मंजूर होऊन लोकशाहीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदविले जाईल,’ असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या अंमलबजावणी संदर्भात १६ एप्रिलपासून संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रा. डाॅ. कुलकर्णी यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा मनीषा लडकत, शहर सरचिटणीस प्रियंका शेंडगे, नगरसेविका निवेदिता एकबोटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाल्या, ‘देशातील महिलांनी विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. केंद्र सरकारमध्ये बारा महिला मंत्री आपल्या खात्यांचा कारभार समर्थपणे सांभाळत आहेत. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे नेतृत्व महिलांच्या सक्षम हातात आहे. लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन महिला सक्षम होत आहेत. या अधिनियमामुळे नारी शक्तीचा सन्मान होऊन लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे.
या अधिनियमाला पाठिंबा देण्यासाठी ९६६७१७३३३३ या क्रमांकावर ‘मिस्ड कॉल’ देऊन महिला सक्षमीकरणाच्या या निर्णयाला पाठबळ द्यावे, असे आवाहनही कुलकर्णी यांनी केले.