पुणे : विलक्षण लोकप्रिय झालेल्या ‘सर’ चित्रपटातील ’सर’ म्हणजेच नसिरूद्दीन शाह आणि ‘वेलजीभाई’ म्हणजेच परेश रावल या दिग्गज अभिनेत्यांनी आपल्या जडणघडणीच्या काळाला उजाळा देत सोमवारी स्मरणरंजनाची सुरेल शब्दमैफल रंगविली. चित्रपटामध्ये अफाट लोकप्रियता मिळवल्यानंतरही रंगभूमीशी नाळ जोडली गेलेल्या या दोघांच्या गप्पांमध्ये रसिकही रममाण झाले. ‘खेल’ नाटकात नसिरभाईंनी माझ्यासमवेत काम केले होते आणि ज्यांच्याकडून शिकलो त्यांना मी दिग्दर्शन केले. ‘हमारा नसीब है की हमारे साथ नसिर ‘सर’ है’, अशीच माझी भावना झाली होती, असे परेश रावल यांनी सांगितले.

महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू कुटुंबियांच्या वतीने पहिल्या श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे अध्यक्ष डाॅ. मोहन आगाशे, एस. पी कुलकर्णी, नाट्य महोत्सवाचे संचालक प्रसाद वनारसे, आनंद लागू या वेळी उपस्थित होते. नसिरुद्दीन यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील (एनएसडी) अनुभवकथन केले. परेश रावल यांनी गुजराती रंगभूमीवरील आठवणींना उजाळा दिला.

‘एनएसडी’ आणि नंतर राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेमध्ये (एफटीआयआय) पुण्यात शिकताना नट प्रशिक्षित नसला तर चालेल. पण, शिक्षित असलाच पाहिजे, हे माझ्या लक्षात आले, असे शाह यांनी आग्रहपूर्वक सांगितले. ‘शेक्सपिअरची नाटके अभ्यासक्रमाचा भाग म्हणून वर्गात शिकवली जायची तेव्हा मला झोप येत असे, पण तीच नाटके रंगभूमीवर बघताना वेगळीच जादू घडत असताना, मी पाहिली आणि अभिनय हाच पुढचा मार्ग, हे मला समजले. चित्रपटांनीही माझ्यावर अशीच जादू केली. परेशच्या अभिनयानेही मी असाच प्रभावित झालो होतो. प्रशिक्षण आणि शिक्षण यामध्ये फरक आहे, हे मला एनएसडी आणि एफटीआयआयमुळे समजले. प्रशिक्षण संस्थांमध्ये तुम्हाला अनुकूल वातावरण, सुविधा मिळते. मात्र, खरे तर जीवनच खूप काही शिकवत असते,’ असे त्यांनी सांगितले. ‘एनएसडीमध्ये अभिनयाचे मूलभूत घटक शिकवलेच जात नव्हते. पुण्यात एफटीआयआयमध्ये आलो, आणि मला दिशा मिळाली. नट म्हणून मला शिक्षित करण्याचे श्रेय एफटीआयआयचे आहे,’ असे शहा म्हणाले.

शालेय जीवनात स्पर्धेच्या निमित्तामने अभिनय करताना, वाट सापडल्याचे सांगून परेश रावल म्हणाले, ‘गुजराती रंगभूमीवर प्रयोग होत असत, पण बारकावे नसायचे. मराठी रंगभूमी मात्र सुरवातीपासून समृद्ध होती आणि आजही आहे. जिथे विद्यार्थी म्हणून जायला हवे होते अशा एनएसडी संस्थेचा अध्यक्षही झालो, असा गमतीदार उल्लेख रावल यांनी केला. ‘शशी कपूर यांनी लाख रुपये चौरस फूट दर असलेल्या जागेत पृथ्वी थिएटर अबाधित राखले, याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. खेल या नाटकात मी नसिरभाईंचा दिग्दर्शक झालो, तेव्हा मलाच त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायच्या आहेत, हे जाणवले. पण आमच्यामध्ये उत्तम केमेस्ट्री होती. संहिता सशक्त असेल, तर नटाचे काम अर्धेअधिक सफल होते, असे ते म्हणाले. मी विचार करणारा अभिनेता नाही. मी समजून घेऊन मुक्तपणे सादरीकरणावर भर देतो.’

आनंद लागू म्हणाले, ‘श्रीराम लागू यांच्या नावाने राष्ट्रीय नाट्य महोत्सव सुरू होणे, ही आनंददायी बाब आहे. नाटक किंवा रंगभूमी हा व्यक्तीला अधिकाधिक सुसंस्कृत करणारा घटक आहे, ही डाॅ. लागू यांची भूमिका होती. त्याचेच प्रतीक म्हणजे हा महोत्सव आहे.’ वनारसे यांनी नाट्य महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सेंटरचे सचिव राजेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.