पुणे : ‘जिवंत अभिनय पाहण्याची अनुभूती देणारी रंगभूमी चिरंजीव आहे आणि सशक्त संहिता व दमदार कलाकारांच्या बळावर ती निरंतर राहील,’ असा निर्वाळा ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी सोमवारी दिला. ‘ओटीटी’ असो किंवा ’कृत्रिम प्रज्ञा’सारखी कितीही माध्यमे आली तरी नाटकाला पर्याय नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर शाह आणि रावल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रंगभूमीचे महत्त्व अधोरेखित केले.
शाह म्हणाले, ‘नाटकाची मूळ ताकद ही रंगमंचावर अनुभवायला मिळते. नाटकावर बेतलेला चित्रपट तितका प्रभावी होत नाही. माझ्या आयुष्यात मी पाहिलेले सर्वोत्तम नाट्यप्रयोग हे प्रामुख्याने मराठी भाषेतील आणि पुण्यात झालेले आहेत. त्यामुळे मराठी रंगभूमीच्या भविष्याची काळजी करण्याची मुळीच गरज नाही. पुण्यातून नेहमीच अत्यंत उत्साही, ऊर्जावान आणि नवे कलाकार उदयास येतात पुण्यातून नाही तर मग कुठून नवे कलाकार मिळणार? ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (एनएसडी) ५० वर्षांपूर्वी प्रवेश तेव्हापासून ‘नाटक आता संपत चालले आहे’ असे ऐकत आलो आहे. पण रंगभूमी आजही तितकीच रसरशीत आणि आनंदात सुरू आहे. दूरचित्रवाणी मालिका सुरू झाल्या, तेव्हाही अशीच भीती व्यक्त केली जात होती. परंतु, या मालिका इतक्या सुमार दर्जाच्या आहेत की कंटाळून प्रेक्षक पळत पुन्हा नाटक पाहायला येतील,’ हे पं. सत्यदेव दुबे यांनी सांगितलेले खरे झाले. आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या दिवशीही केलेला नाटकाचा प्रयोग हाउसफुल्ल होता,’ असेही शाह यांनी सांगितले.
रावल म्हणाले, ‘प्रेक्षकांना त्यांच्या डोळ्यांसमोर जिवंत अभिनय पाहण्याची अनुभूती केवळ नाटकच देऊ शकते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा कितीही विकास झाला तरी नाटकाचे स्थान अढळ राहील. रंगमंचावर जे काही घडते ते प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर घडत आहे. हे एआयसारखे कोणतेही ‘पॅकेज्ड फूड’ (तयार अन्न) नाही. भाजी चिरून, फोडणी देऊन तयार केलेल्या जेवणाचा आनंद नाटकाच्या थेट सादरीकरणाचा असतो. त्यामुळे नाटक कधीही नष्ट होणार नाही., असे रावल यांनी सांगितले.
‘देवबाभळी’, ‘असेन मी नसेन मी’ सारखी नाटके मराठी रंगभूमीची ताकद दाखविणारी आहेत. येथे एकाच वेळी ५२ वेगवेगळे नाट्यप्रयोग सुरू असतात, ही थक्क करणारी बाब आहे. मराठी प्रेक्षक खरोखरच नशीबवान आहेत, अशी प्रशंसा रावल यांनी या वेळी केली.
