पुणे : प्रभात रस्त्यावरील एका बंद असलेल्या बंगल्यात दरोडा टाकण्यासाठी शिरलेल्या दरोडेखोरांनी गस्तीवरील दोघा पोलीस मार्शलवर हल्ला केला. त्यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यातील फरार गुन्हेगारांपैकी एकाला आठ महिन्यांनंतर नाशिक येथून अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाला यश आले.

फिरोजखाँ शरीफखाँ दुल्होत ऊर्फ मेवाती (वय ३४, रा. झंजाळा, अंबई, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार महेश तांबे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात दिली आहे. हा प्रकार २२ ऑक्टोंबर २०२४ रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडला होता.

महेश तांबे आणि गणेश सातव हे मार्शल म्हणून रात्रगस्तीवर होते. गस्त घालत असताना ते पहाटे अडीच वाजता प्रभात रस्त्यावरील अभिनव विद्यालय पथ येथील जानकी व्हिला बंगल्यासमोर आले. तेव्हा तेथे दुचाकीवर दोघे जण थांबलेले दिसले. त्यांनी या दोघांकडे चौकशी केल्यावर त्यांनी बंद बंगल्याकडे पहात आवाज दिल्यानंतर सहा ते सात जण बाहेर आले. त्यांनी या दोघा पोलिसांवर हल्ला केला. तेव्हा, तांबे यांनी आपल्याकडील पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. त्या दोघांच्या पायाला लागल्या होत्या. गोळीबार झाल्यावर ते पळून गेले होते. त्यातील एकाला गुन्हे शाखेने यापूर्वी पकडले होते. इतर पाच गुन्हेगारांना न्यायालयाने फरार घोषित केले होते.

गुन्हे शाखेतील युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना १ जुलै रोजी या गुन्ह्यातील पोलीस अंमलदारांवर गोळीबार करणारा मुख्य गुन्हेगार फिरोजखाँ दुल्होत हा नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाली. बातमीच्या अनुषंगाने पोलिसांचे पथक तातडीने नाशिकला रवाना झाले. या पथकाने भद्रकाली येथील कान्हेरेवाडीमधील बी. डी. भालेकर मैदानात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी त्याला डेक्कन पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, सारंग दळे, कानिफनाथ कारखेले, प्रशांत कापुरे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, नितीन घाडगे, बाळासाहेब तनपुरे, पानसरे, नेहा तापकीर, मांदळे, नरवडे यांनी केली.