पुणे : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीच्या नाशिकमधील कार्यालयातील अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. असे असताना माहिती तंत्रज्ञान कंपनीने या प्रकरणी खुलासा करीत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याचे जाहीर केले आहे. या प्रकरणाच्या चौकशीत तपास यंत्रणांना सर्वतोपरी सहकार्य केले जात असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

माहिती तंत्रज्ञान कंपनीने म्हटले आहे की, अत्याचार आणि इतर गैरप्रकाराचे प्रकरण कंपनी थारा देत नाही. आम्ही कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि कल्याणाला नेहमीच प्राधान्य देतो. यासाठीची उच्च मानके आम्ही स्वीकारलेली असून, त्यांचे पालन केले जाते. कर्मचाऱ्यांच्या छळाच्या घटनांना व्यवस्थापन सहन करणार नाही. नाशिकमधील प्रकरणात चौकशी सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमधील प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तातडीने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याचबरोबर चौकशीत तपास यंत्रणांना सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे.

नेमके प्रकरण काय?

कंपनीत कार्यरत सहकारी कर्मचाऱ्यांकडून महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे आणि धर्मांतराचा प्रयत्न आदी प्रकार घडल्याचे समोर आले आहे. महिला लैंगिक शोषणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला असता धक्कादायक बाबी समोर आल्या. लैंगिकदृष्ट्या जवळीक साधण्यासाठी लज्जास्पद वर्तन, पीडितांना स्पर्श करणे, वैवाहिक आयुष्याविषयी, वैयक्तिक आयुष्यात संतती नसल्याबाबत बोलणे, बळजबरीने मांसाहार सेवन करायला लावणे, शरीरावरून अश्लील शेरेबाजी यासह एका युवकाच्या धर्मांतराचा प्रयत्न आदी तक्रारींवरून आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले आहेत.

कामगार विभागाकडून तपासणी

या प्रकरणानंतर कंपन्यांतील महिला कर्मचाऱ्यांच्या अत्याचाराच्या प्रकरणांची चर्चा सुरू झाली आहे. अनेक कंपन्यांमध्ये महिलांवरील अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी अंतर्गत समित्या स्थापन नसल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर कामगार आयुक्तालयाने कंपन्यांची तपासणी मोहीम हाती घेणार आहे. याबाबत कामगार उपायुक्त निखिल वाळके म्हणाले की, पुण्यातील कंपन्यांच्या कार्यालयात अंतर्गत समिती आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे. याचबरोबर या समित्यांकडे करण्यात आलेल्या तक्रारींची तपासणीही केली जाईल. तसेच, समितीकडून महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर काय कार्यवाही करण्यात आली, याचीही माहिती घेण्यात येईल. यात तपासणीत मोहिमेत नियमांचा भंग आढळून आल्यास संबंधित कंपन्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. नाशिकमधील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी पावले उचलण्यात येत आहेत.