नारायणगाव : कल्याण-अहिल्यानगर रस्त्यावरील डुंबरवाडी येथे शाळेच्या सहलीसाठी निघालेली एसटी बस उलटून १८ जण जखमी झाले. गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली. जखमींमध्ये १४ विद्यार्थी आणि चार शिक्षकांचा सामवेश आहे.
नेवासा तालुक्यातील पिंपरी शाहाली येथून ओझर- लेण्याद्रीच्या दिशेने सहलीसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन एसटी बस निघाली होती. बस डुंबरवाडी येथील टोल नाक्याजवळ आली. त्यावेळी चालकाचा बसवरील ताबा सुटला. बस वेगात असल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाच्या कठड्याला धडकली. या धडकेत बसचा पुढील टायर फुटल्याने बस उलटली. त्यामध्ये १४ विद्यार्थी आणि चार शिक्षक जखमी झाले. बसमध्ये ५३ विद्यार्थी होते, अशी माहिती ओतूर पोलिसांनी दिली. या प्रकारानंतर एकच गोंधळ उडाला.
ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक दाखल झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदत केली. बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. जखमी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
