पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्यात आली आहे. या प्रकरणात विशेष न्यायालयात सायबर तज्ज्ञांची साक्ष मंगळवारी नोंदविण्यात आली. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सायबर तज्ज्ञांची साक्ष नोंदविली. ॲड. प्रथमेश शिंगणे यांनी सहाय्य केले. सायबर तज्ज्ञांनी सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच अन्य तांत्रिक बाबींची माहिती न्यायालयात दिली.

‘सरकार पक्षाकडून साक्ष नोंदविण्याचे कामकाज बुधवारपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आरोपीचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू होईल. त्यानंतर अंतिम युक्तिवादास सुरुवात होईल’, असे विशेष सरकारी वकील मिसर यांनी सांगितले.

साक्ष नोंदविताना पीडित बालिकेच्या कुटुंबीयांचे वकील राधिका नावंदर-जोशी, मनीष पाडेकर उपस्थित होते. मिसर यांनी ससून रुग्णालयाने दिलेला शवविच्छेदन अहवाल सादर केला. संबंधित अहवाल त्यांनी न्यायालयासमोर वाचून दाखविला. मिसर यांनी वैद्यकीय पुरावा न्यायालयासमोर सिद्ध (शाबीत) केला. ‘न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली’, असे मिसर यांनी सांगितले.