पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणाची जलदतगीने सुनावणी सुरू असून, आरोपी भीमराव कांबळे विरुद्ध ५५ जणांनी साक्ष दिली. संवेदनशील प्रकरणात अवघ्या १६ दिवसात ५५ जणांची साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया पार पाडली. शुक्रवारी (१९ जून) आरोपी कांबळे याचा जबाब नोंदविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र दिनी नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले. या प्रकरणात भीमराव कांबळे (वय ६५) याला अटक करण्यात आली. खून प्रकरणानंतर पोलिसांनी जलदगतीने तपास करून आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यात आले. खून प्रकरणानंतर पंधरा दिवसांच्या आत पोलिसांनी ११०० पानी आरोपपत्र कांबळेविरुद्ध विशेष न्यायालयात दाखल केले. कांबळेविरुद्ध आरोप निश्चित झाल्यानंतर विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू झाली. या खटल्यात नाशिकचे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांची विशेष सरकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या खटल्यात सरकार पक्षाकडून ५५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पीडित बालिकेचे आई-वडील, आजीची साक्ष नाेंदविण्यात आली. बालिकेला आरोपी घेऊन निघाला होता. त्या वेळी तीन मुलांनी त्याला पाहिले होते. तीन मुलांची साक्ष, घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रीकरण, न्यायवैद्यक अहवाल, अन्य तांत्रिक पुरावे सादर करण्यात आले. आरोपी आणि बालिकेच्या डीएनए नमुन्याचे विश्लेषण करण्यात आले. आरोपीने हा गुन्हा केल्याचे सरकार पक्षाने सिद्ध (शाबीत) केले आहे. बचाव पक्षाकडून साक्षीदारांची उलटतपासणी घेण्यात आली.
या खटल्यात सरकार पक्षाकडून सहायक वकील म्हणून प्रथमेश शिंगणे हे काम पाहत आहेत. पीडित बालिकेच्या कुटुंबीयांकडून ॲड. राधिका नावंदर-जोशी, ॲड. मनीष पाडेकर हे काम पाहत आहेत.
‘नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी कांबळे याचा जबाब शुक्रवारी नोंदविण्यात येणार आहे. न्यायालयाने आरोपीचे कारागृहातील वर्तन आणि कौटुंबिक वर्तनाचा अहवल तपास अधिकाऱ्यांकडून मागविला आहे. आरोपीचा जबाब नोंदविल्यानंतर सरकार आणि बचाव पक्षाकडून अंतिम युक्तिवाद केला जाणार आहे’, असे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितले.
