Nasrapur case: नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणाचा निकाल २९ जून रोजी न्यायालयाने राखून ठेवला आहे. दरम्यान, शिक्षेबद्दल कांबळेला विचारण्यात आले त्यावेळी त्याने न्यायालयाला काय माहिती दिली याचा तपशील आज सरकारी वकील आणि पोलिसांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिला. “शिक्षेबद्दल तुझं काय म्हणणे आहे? असे विचारले असता आरोपीने ३५१ कलमाच्या अंतर्गत नोंदवलेला जबावाचा पुनरुच्चार केला”, अशी माहिती सरकारी वकील विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली.
आरोपीने स्वत:च्या बचावात काय सांगितले?
“बालिकेला गायीचे वासरु दाखविण्यासाठी मी गोठ्याकडे घेऊन गेलो होतो. मी मुलीला कडेवर घेतलं होतं, माझा पाय पाईपमध्ये अडकला आणि मी खाली पडलो. यात मुलीला जखम झाली आणि ती रडू लागली. माझ्या कोणी संशय घेऊ नये म्हणून मी तिला खाटेवर ठेवून निघून गेलो”, अशी माहिती आरोपी कांबळेने पुन्हा न्यायालयाला दिल्याची माहिती सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली. यावर बाजू मांडताना, “हा गुन्हा अतिशय थंड डोक्याने, विचारपूर्वक, कट, कारस्थान रचून करण्यात आला आहे. हा गुन्हा अतिशय गंभीर आणि नीच दर्जाचा आहे यावर भर देण्यात आला”, असे अजय मिसर यांनी सांगितले.

बलात्काराचा आरोप सिद्ध – सरकारी वकील अजय मिसर
“आरोपीला जन्मठेप न देता मृत्यूदंड म्हणजेच फाशीची शिक्षा का दिली जावी? याबाबत न्यायालयात युक्तिवाद झाला. मुलीचे घटनेवेळी वय तीन वर्ष, दोन महिने आणि सात दिवस, मुलीवर एकूण ३९ मिनिट शोषण केले असून, तिच्या देहावर १८ जखमा आढळून आल्या आहेत. मुलीचा विनयभंग करुन बलात्कार केल्याचा न्यायालयात आम्ही सिद्ध करु शकलो”, अशी माहिती सरकारी वकील आणि पोलिसांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. “आरोपीने पीडितेच्या मृतदेहाशी देखील अनैसर्गिक संबंध केल्याचे देखील आम्ही सिद्ध केले आहे. त्यामुळे अशा विकृत माणसाला जगण्याचा अधिकार नाही”, असा युक्तिवाद केल्याचे मिसर म्हणाले.
२९ जून रोजी निकाल – मिसर
आरोपीला मृत्यूदंडाशी शिक्षा देण्याबाबत आग्रही युक्तिवाद केल्याची माहिती सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली. दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने येत्या २९ जून रोजी निकाल राखून ठेवल्याचेही मिसर यांनी स्पष्ट केले. २९ तारखेला युक्तिवाद होणार नाही, त्यावेळी जन्मठेप का मृत्यूदंड याबाबत न्यायालय निर्णय देईल, असेही मिसर म्हणाले.
नसरापूर अत्याचार प्रकरण दृष्टीक्षेपात
- नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करुन खून
- राज्यभरात संतप्त पडसाद, चार तासांहून जास्त वेळ मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर रास्ता रोको
- आरोपी भीमराव कांबळे याला अटक
- ग्रामीण पोलिसांकडून तपासासाठी विशेष पथक
- गुन्हा घडल्यानंतर १५ दिवसात १२०० पानी आरोपपत्र
- विशेष न्यायालयाकडून आरोप निश्चित
- ‘इन कॅमेरा’ पद्धतीने जलदतगीने सुनावणी
- बालिकेच्या आई, वडीलांसह आजीची साक्ष
- प्रत्यक्षदर्शी तीन मुलांसह न्यायवैद्यकीय तज्त्रांची साक्षही महत्त्वाची
- खटल्यात ५५ जणांची साक्ष नोंंदविण्याची प्रक्रिया
- सरकार आणि बचाव पक्षाकडून अंतिम युक्तिवाद
