पुणे : नसरापूर, तसेच म्हाळुंगेतील अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने घेतला आहे.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर, तसेच म्हाळुंगे येथील अत्याचार प्रकरणांची गंभीर दखल घेत पुणे जिल्हा प्रमुख न्यायाधीश आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांनी शुक्रवारी तातडीने मनोधैर्य समिती सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीत संबंधित प्रकरणातील कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर या दोन्ही प्रकणातील पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने घेतला.
मनोधैर्य योजने अंतर्गत मंजूर झालेल्या रक्कमपैकी २५ टक्के पीडित किंवा कुटुंबीयांना दिली जाते. उर्वरित रक्कम दहा वर्षांसाठी मुदत ठेवीत ठेवली जाते. राज्य शासनाकडून बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रकरण, तसेच ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई म्हणून मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत केली जाते.
सामूहिक बलात्कार प्रकरणात चौघांना २० वर्षे सक्तमजुरी
समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चौघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. भोसले यांनी २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
नोमान जावेद खान (वय १९), मनान जावेद खान (वय २०), सोहेल शेरअली पीरजादे (वय २१), मुस्ताक सलीम सय्यद (वय ३२, चौघे रा. देहूरोड) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका पीडित तरुणीने फिर्याद दिली होती. देहूरोड परिसरात जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत ही घटना घडली होती.
आरोपी नोमान याचे तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्याने तरुणीशी संबंध ठेवले. आरोपी मुस्ताक याने मोबाइलवर चित्रीकरण केले. समाज माध्यमात ही चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन मनान, सोहेले, मुस्ताक आणि नाेमान यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणात एक अल्पवयीन आरोपी होता.
या खटल्यात विशेष सरकारी वकील विजय पाटील यांनी २२ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. गुन्हा गंभीर स्वरुपाच असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची विनंती सरकारी वकील पाटील यांनी युक्तिवादात न्यायालयाकडे केली. न्यायालयाने पीडित तरुणीची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना २० वर्षे सक्तमजुरी आणि ३५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
आरोपीविरुद्ध सामूहिक बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
