पुणे : नसरापूर अत्याचार आणि खूनप्रकरणी जलदगतीने तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने सहा अधिकाऱ्यांचे एक पथक तयार केले असल्याची माहिती पुणे ग्रमीण पोलिसांनी रविवारी दिली. त्यात दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१ मे) उघडकीस आली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी रात्री नसरापूरनजीक पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखून धरला, तसेच शनिवारी मोर्चा काढून बंद पुकारला. त्यानंतर शनिवारी सायंकाळी संतप्त नागरिकांनी पुण्यातील नवले पुलाजवळ मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर तीव्र आंदोलन केले.
या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला सात मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्याच्याविरुद्ध खून, बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध आधीही विनयभंग आणि बालकावर अत्याचार प्रकरणात (पोक्सो) गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण संवेदनशील असल्याने, तसेच या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा, यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र तपास पथकाची स्थापना करण्यात आली.
दरम्यान, नसरापूर अत्याचार प्रकरणाचा विविध अंगांनी तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘आरोपी भीमराव कांबळेची वैद्यकीय तपासणी, रासायनिक विश्लेषण तपासणी, तसेच लैंगिक सक्षमतेची चाचणी करायची आहे. आरोपीने पीडित मुलीवर यापूर्वी अत्याचार केले आहेत का, तसेच अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का, या दृष्टीने तपास करायचा आहे. बालिकेला घेऊन जाताना आरोपीला साक्षीदारांनी पाहिले आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत. आरोपीने बालिकेचा खून करण्यासाठी कोणते शस्त्र वापरले, आरोपीला या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली का, अशा मुद्द्यांवर पोलिसांकडून तपास करण्यात येणार आहे,’ असे पोलिसांनी सांगितले.
‘राजकीय नेत्यांनी भेटू नये’
‘जोवर माझ्या मुलीला न्याय मिळत नाही आणि या प्रकरणातील नराधमाला फाशी होत नाही, तोवर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सांत्वनासाठी आमची भेट घेण्यास येऊ नये, अशी माझी नम्र विनंती आहे,’ असे आवाहन करणारी चित्रफित नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित बालिकेच्या वडिलांनी रविवारी प्रसारित केली.
