पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याच्याविरुद्ध चौदा दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणाची जलदगतीने सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकरणाची सुनावणी येत्या २१ मेपासून पुण्यातील विशेष न्यायालयात दररोज होणार आहे.

महाराष्ट्र दिनी भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्यचाार करुन तिचा खून करण्यात आल्यााची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेचे संतप्त पडसाद पुणे शहर, तसेच राज्यात उमटले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन भीमराव कांबळे (वय ६५) याला अटक केली. गुन्हा घडल्यानंतर पोलिसंनी सखोल तपास करुन आरोपी कांबळे याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात ११०० पानी आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्र न्यायवैद्यक अहवाल, सीसीटीव्ही चित्रीकरण, तांत्रिक पुरावे, तसेच शवविच्छेदन अहवाल, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब जोडण्यात आले आहेत. नसरापूर अत्याचार प्रकरणाची जलदगतीने सुनावणी घेऊन आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

‘नसरापूर अत्याचार प्रकरण संवेदनशील आहे. या प्रकरणाची सुनावणी येत्या २१ मेपासून दररोज घेण्यात येणार आहे. खटला जलदगतीने चालविण्यात येणार आहे.’ अशी माहिती विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली. या प्रकरणात ॲड. मिसर यांना ॲड. सुरेश गायकवाड, ॲड. प्रमेश शिगणे हे सहाय करणार आहेत. ॲड. मिसर हे २००० पासून सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत. विविध गंभीर गु्ह्यांच्या खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे.

सुनावणी ‘इन कॅमेरा’ ?

नसरापूर अत्याचार प्रकरणाची सुनावणी दररोज होणार आहे. ही सुनावणी बंद खोलीआड (इन कॅमेरा) होणार आहे. पीडित बालिकेच्या कुटुंबीयांची ओळख न पटू देणे, तसेच संवेदनशील बाबी विचारात घेऊन न्यायालयाकडून आवश्यक ती काळजी घेण्यात येणार आहे. आरोपीला दररोज कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर केले जाणार आहे. न्यायालयीन सुनावणी जलदगतीने पूर्ण करुन आरोपीला कठो शिक्षा होण्यासाठी शासन, तसेच पोलीस प्रयत्नशील आहेत.

पोलिसांनी तपास करुन अवध्या चौदा दिवसात आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी जलदगतीने घेऊन आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी शासन आणि पोलीस प्रयत्नशील आहेत. पीडीत बालिकेच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे, तसेच समाजात कठोर संदेश देण्यासाठी या प्रकरणाची जलदगतीने सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. – अजय मिसर, विशेष सरकारी वकील