पुणे : नसरापूर येथे एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय नराधमाला पुणे न्यायालयाने १२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामध्ये नागरिकांमध्ये असलेला संताप आणि सुरक्षेची परिस्थिती पाहता, आरोपीला बुधवारी प्रत्यक्षात न्यायालयात न आणता गुरुवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर हजर करण्यात आले होते.

ही संतापजनक घटना शुक्रवारी (१ मे) दुपारी तीन ते रात्री आठच्या दरम्यान राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्याची दखल घेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (खून), ६४ (बलात्कार), ७४ (विनयभंग), १३७ (२), १४० (१), १४० (३) (अपहरण) आणि ‘पोक्सो’  कायद्यांतर्गत कठोर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान तपास अधिकारी विजयमाला पवार आणि विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ‘आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी आणि रासायनिक विश्लेषण अहवाल तपासणी करण्यात आली आहे. तसेच, आरोपीने यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का? किंवा पीडित मुलीवर आधीही अत्याचार केला होता का?, याचा शोध घेणे गरजेचे आहे.

घटना घडल्यानंतर आरोपी त्याच्या खांद्यावर एक गाठोडे घेऊन जाताना सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये दिसत आहे. त्या गाठोड्याचा शोध घेणे बाकी असून त्यात नेमके काय होते याबाबत देखील तपास करणे बाकी आहे. तसेच आरोपी आणि मुलगी गोठ्यात जात असताना त्याच्या हातात शेवपुडा देखील दिसून आला आहे. ती शेव नेमक्या कोणत्या दुकानातून घेतली याबाबत तपास करणे आहे,’ असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

पीडित मुलीच्या शरीरावर ज्या जखमा आढळून आल्या आहेत, त्या कोणत्या हत्याराने करण्यात आल्या आहे याबाबतचा तपास करणे आहे.आरोपीने चिमुकलीची हत्या करण्यासाठी नेमक्या कोणत्या हत्याराचा वापर केला, ते अद्याप हस्तगत करायचे असून महत्त्वाचे पुरावे गोळा करायचे आहेत. ज्या साक्षीदारांनी आरोपीला मुलीला घेऊन जाताना पाहिले, त्यांचे जबाब नोंदवण्याचे कामही सुरू आहे. या गुन्ह्यात आरोपीला अन्य कोणाची मदत लाभली आहे का, याचीही कसून चौकशी पोलीस करत आहेत. या सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीला १२ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.