पिंपरी: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पिंपरी महापालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीसह शहराती सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० वाजता राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे. १५ ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. शासकीय कार्यालयांमध्ये अशी प्रथा सुरु करणारी, पिंपरी चिंचवड ही राज्यातील पहिलीच महापालिका असल्याचे प्रशासक व आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्त महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी, सहकारी संस्थांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करावी, असे आवाहन पालिकेने यापूर्वीच सर्वांना केले आहे. त्यापाठोपाठ, महापालिकेने राष्ट्रगीत वाजवण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिकेच्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये देशाप्रती असलेला आदर अधिक वृद्धिंगत करणे, प्रत्येकाच्या मनात देशभक्ती, राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेची ज्योत तेवत ठेवण्याच्या हेतूने कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० वाजता राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे. राष्ट्रगीतातून सकारात्मक उर्जा निर्माण होते. शिवाय सेवेची भावना वृद्धिंगत होते, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, सुरत महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी विशिष्ट गणवेषात असतात. त्या धर्तीवर पिंपरी पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशिष्ट ‘ड्रेसकोड’ लागू करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. निश्चित केलेले गणवेश परिधान करून १५ ऑगस्टपासून पालिका अधिकारी व कर्मचारी कार्यालयात हजर राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.