पुणे : भेसळयुक्त ताडीमुळे नागरिकांचा बळी गेल्याच्या घटना वारंवार कानावर पडतात. आता ताडीतील भेसळ ओळखणारे किट राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) विकसित केले आहे. ताडीतील क्लोरल हायड्रेटची भेसळ जलदपणे आणि सहजपणे तपासणे या किटमुळे शक्य होत आहे. या तंत्रज्ञानाचे व्यावसायिक स्वीकार करण्यासाठी ते टेंभुर्णीतील ऑथेंटिक केमिकल्स अँड रिसर्च सेंटरकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
ताडाच्या झाडापासून किण्वन प्रक्रिया झालेली ताडी नैसर्गिकरित्या मिळविली जाते. सरकारी विक्री केंद्रातून तिची विक्री केली जाते. ताडीमध्ये ५ ते ६ टक्के इथिल अल्कोहोलसह आरोग्यासाठी फायदेकारक असलेले नैसर्गिक घटक असतात. महाराष्ट्र सरकारने ताडीच्या गुणवत्तेबाबत एक समिती स्थापन केली होती. त्यात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, ताडी पुरवठादार, एनसीएलच्या शास्त्रज्ञांसह इतर तज्ज्ञांचा समावेश होता. ताडीमध्ये क्लोरल हायड्रेट या गुंगी आणणाऱ्या रसायनाची भेसळ मोठ्या प्रमाणात होत असल्याची बाब समितीच्या अभ्यासातून समोर आली होती. या रसायनाच्या विक्रीस भारतात मनाई असूनही, ते मोठ्या प्रमाणात ताडी नमुन्यांमध्ये आढळले होते.
सध्या ताडीच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक उपकरणे सोबत ठेवावी लागतात. याचबरोबर तो नमुना पुढे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावा लागतो. यामुळे नमुन्यांचा तपासणी अहवाल मिळण्यास विलंब होतो. या अडचणींचा विचार करून एनसीएलमधील शास्त्रज्ञांनी ताडीतील भेसळीची तपासणी करण्यासाठी सीएचटी-किट विकसित केले आहे.
या किटमुळे ताडीतील भेसळ जागेवरच तपासता येते. ताडीमध्ये क्लोरल हायड्रेटची भेसळ प्रतिलिटर १० मिलिग्रॅमपेक्षा जास्त असल्यास तिचा रंग गुलाबी होतो. त्यामुळे ताडीतील भेसळ तातडीने शोधता येते. राज्य सरकारच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने या किटची वैधता आणि उपयोगिता तपासली आहे. हे तंत्रज्ञान एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले यांनी ऑथेंटिक केमिकल्स अँड रिसर्च सेंटर संस्थेकडे व्यावसायिक स्तरावर वापरासाठी हस्तांतरित केले आहे.
क्लोरल हायड्रेट धोकादायक
ताडीमध्ये प्रामुख्याने क्लोरल हायड्रेटची भेसळ केली जाते. हे रसायन गुंगी आणणारे असून, याची भेसळ केलेली ताडी पिल्याने त्याचे व्यसन लागण्याचा धोका असतो. मानवाने क्लोरल हायड्रेट प्राशन केल्यानंतर त्याचे रुपांतर ट्रायक्लोरोइथेनॉल आणि ट्रायक्लोरोॲसेटिक ॲसिडमध्ये होते. हे दोन्ही रासायनिक घटक आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे आहेत. त्यामुळे अंगावर लाल चट्टे, उलट्या, पचनाशी निगडित विकार, अल्सर, अवयवांना हानी तसेच, कोमाममध्ये जाणे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. याचबरोबर हे घटक कर्करोगास कारणीभूत ठरणारे आहेत.

