पुणे : ‘राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून, त्या संदर्भात गुन्हे दाखल करण्यास विलंब होत आहे. या संदर्भात पोलिसांनी संवेदनशीलता दाखवून महिलांचे म्हणणे ऐकावे आणि कायद्यानुसार योग्य ते गुन्हे दाखल करावेत,’ असा आदेश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिला. पालखी सोहळ्यावेळी दौंड येथे एका अल्पवयीन वारकरी मुलीवरील अत्याचाराची दखलही राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली असून, तीन दिवसांत अहवाल सादर करण्याची सूचना त्यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात रहाटकर यांच्या उपस्थितीमध्ये महिला जनसुनावणी झाली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पुणे शहर अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पीडित महिला या वेळी उपस्थित होत्या.
महिला जनसुनावणीत राष्ट्रीय महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या ३५ पैकी २० तक्रारींबाबत जागेवर निर्णय घेण्यात आला. ऐन वेळी दाखल झालेल्या २१ तक्रारींची दखल घेऊन कार्यवाही करण्यात आली. दरम्यान, उर्वरित प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्वरित त्याची दखल घेण्याचा आदेश रहाटकर यांनी दिला.
राष्ट्रीय महिला आयोगाकडे देशातील विविध भागांतून पीडित महिलांच्या तक्रारी प्राप्त होत असतात. या महिलांना दिल्ली येथील आयोगाच्या कार्यालयात येण्या-जाण्यास येणाऱ्या अडचणींचा विचार करता ‘राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत राज्याची राजधानी, तसेच विभागनिहाय ‘महिला जनसुनावणी’ आयोजित करण्यात येत असून, त्याला प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात लवकरच महिला जनसुनावणीची शंभरी पूर्ण होणार आहे.
या सुनावणीत सर्व संबंधित विभागांच्या मदतीने पीडित महिलांना न्याय देण्याची आयोगाची भूमिका आहे. त्यामुळे महिलांच्या तक्रारींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तक्रारी मार्गी लावण्याकरिता पारदर्शकपणे कामे करावीत, असे या वेळी रहाटकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी मनीषा बिरारीस यांनी केले.