पुणे : शिक्षणातील गुणवत्ता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवून सक्षम मार्गदर्शक घडवण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) नॅशनल मिशन फॉर मेन्टिरग प्रस्तावित केले आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या पातळीवर राबवल्या जाणाऱ्या या अभियानासाठी ब्ल्यूबूक फॉर मेन्टिरग या नावाने एनसीटीईकडून मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या असून, मार्गदर्शक सूचनांच्या मसुद्यावर भागधारकांकडून हरकती, सूचना मागवण्यात आल्या आहेत. 

शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी आताच्या काळात निर्माण झालेल्या अभूतपूर्व मागण्या पूर्ण करण्यासह नव्या आव्हानांना तोंड देण्याची गरज आहे. तसेच नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षण क्षेत्राच्या रचनेत संपूर्ण बदल, वेगवेगळय़ा स्तरावर मार्गदर्शन (मेन्टिरग) प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यात विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठीही मार्गदर्शनाची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षकांचा आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे बदलत्या काळासह जुळवून घेण्यासाठी शिक्षकांची क्षमतावृद्धी करण्याची गरज लक्षात घेऊन त्यांना व्यावसायिक पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी नॅशनल मिशन फॉर मेन्टिरग सुरू करण्यात येणार आहे.  अभियानाअंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. मार्गदर्शनासाठी विविध पद्धतींचा वापर करण्यासह नॅशनल मेन्टिरग इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मितीही करण्यात येणार आहे. मुक्तस्रोत आणि ऑनलाइन अशी ही प्रणाली असल्याचे मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा एनसीटीईच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, तीस दिवसांत त्यावर हरकती-सूचना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.