पुणे : पुणे शहरातील उद्योगांचा विस्तार आणि गरज लक्षात घेता पुणे विमानतळावरून लवकरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलादमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी केली. पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल मे २०२३ पर्यंत सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे विमानतळाजवळ उभारण्यात आलेल्या बहुमजली वाहनतळाचे (एरोमॉल) उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, आमदार सुनील टिंगरे, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक अनिल गुप्ता, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके आदी त्या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिंदे म्हणाले,की पुण्यावरून १२ नोव्हेंबरपासून बँकाॅकची थेट विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. आता १ डिसेंबरपासून सिंगापूरलाही थेट विमान सेवा सुरू होईल. पुणे विमानतळावर नवीन टर्मिनलचा विस्तार मे २०२३ पर्यंत करण्यात येणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून त्यासाठी ५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पुण्यातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासह उद्योगांचा विस्तार आणि मागणी लक्षात घेता पुण्यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीची स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात येणार आहे. पुण्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. कला, संस्कृती, व्यापार, औद्योगिकनगरी अशी या शहराची वैशिष्ट्यं आहेत. पुण्याचा नावलौकिक केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी आवश्यक त्या सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National international cargo pune airport announcement jyotiraditya shinde pune print news ysh
First published on: 26-11-2022 at 01:07 IST