पुणे : ‘देशात वैद्यकीय पदवीच्या तुलनेत पदव्युत्तर जागांचे प्रमाण जवळपास निम्मे आहे. ब्रिटनसारख्या देशात हे प्रमाण दोन पदव्युत्तर जागांमागे एक पदवीची जागा, असे आहे. देशात आगामी काळात पदव्युत्तरच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येऊन पदव्युत्तर आणि पदवीच्या जागांचे गुणोत्तर एकास एक होईल,’ अशी घोषणा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. अभिजात शेठ यांनी केली.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने आयोजित एकविसाव्या वार्षिक संशोधन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. शेठ बोलत होते. कुलगुरू डॉ. विवेक सावजी, कार्यवाह व प्र-कुलगुरू डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप, प्राचार्य डॉ. मंदार करमरकर आणि रवींद्रनाथ टागोर स्कूलच्या अध्यक्ष स्वप्नाली कदम आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. शेठ म्हणाले, ‘भारतात पदवीच्या तुलनेत पदव्युत्तरच्या जागा कमी आहेत. अमेरिकेत पदव्युत्तर-पदवी जागांचे गुणोत्तर १.५:१ आहे. आपल्याकडे पदवीच्या तुलनेत पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांची संख्या निम्म्याने कमी आहे. पूर्वी पदवी घेतलेल्या डॉक्टरला सर्व येते, अशी धारणा होती. आता काळानुसार सुपर स्पेशालिटी शाखा वाढत आहेत. त्यामुळे पदव्युत्तर डॉक्टरांची मागणी वाढत आहे. त्यातून प्रत्येक पदवीधर डॉक्टरला पदव्युत्तरची संधी उपलब्ध करून देण्याचे पाऊल उचलण्यात येईल. त्याने पदव्युत्तर करावे की नाही, हा शेवटी त्याचा प्रश्न असेल. मात्र, या दृष्टीने आपण पायाभरणी करणार आहोत.’
‘वैद्यकीयच्या २० हजार जागा वाढविण्यात आल्या आहेत. जागा वाढल्याने प्रवेश मिळविणारे आनंदी आहेत, तर काही जण गुणवत्ता कमी होईल, अशी शंका व्यक्त करत आहेत. संख्या वाढल्याने दर्जावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. भविष्यात संख्या वाढविली, तरी त्याची गुणवत्तेशी सांगड आपल्याला घालावी लागेल.
देशात डॉक्टरांची संख्या सगळीकडे समसमान नाही. काही ठिकाणी जास्त, तर काही ठिकाणी अतिशय कमी डॉक्टर आहेत. डॉक्टरांची संख्या वाढविण्याचे पाऊल आपण उचलले आहे. त्यांना शिक्षण देताना दर्जावर लक्ष देण्याची जबाबदारीही आपली आहे,’ असे डॉ. शेठ यांनी नमूद केले.
आयोग ‘पंचिंग बॅग’
‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोग हा सर्वांसाठी ‘पंचिंग बॅग’ बनला आहे. प्रत्येक गोष्टीतील त्रुटींसाठी आयोगाकडे बोट दाखविले जाते. हे करताना सर्वांनी या एकूण व्यवस्थेचा विचार करायला हवा. महाविद्यालयांनी अथवा वैद्यकीय क्षेत्राने आयोगावर टीका करताना आपणही त्याचा घटक आहोत, याचे भान राखावे. तुम्ही या क्षेत्राचे भागीदार असल्याने काही गोष्टींसाठी तुम्हीही जबाबदार आहात. धोरणांवर टीका आणि चर्चा व्हायला हवी. परंतु, प्रत्येकाने आपली जबाबदारीही विसरू नये,’ असे डॉ. अभिजात शेठ यांनी स्पष्ट केले.
