पुणे : आज (३ ऑगस्ट ) राष्ट्रीय अवयवदान दिन. त्यानिमित्त सातारा जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातून अवयवदान साक्षरतेचा जागर होत आहे. खटाव तालुक्यातील वडगाव या दुर्गम गावात जयराम स्वामी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाने अवयवदानाची जनजागृती केवळ शिक्षकांपुरती मर्यादित न ठेवता ती पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभिनव पुढाकार घेतला आहे.

विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व २९ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि सुमारे २२५ माजी विद्यार्थी अवयवदानाचे अर्ज भरून जीवनदानाचा संकल्प करणार आहेत. १३ ऑगस्टच्या जागतिक अवयवदानदिनी ८०० ते १००० पालकही या अवयवदान मोहिमेत सहभागी होणार आहेत.

जवळपास चार हजार लोकसंख्या असलेल्या या दुर्गम गावातील जयराम स्वामी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सुमारे ८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आजूबाजूच्या अनेक लहान गावांतील विद्यार्थ्यांसाठी हीच शाळा शिक्षणाचा आधार आहे. मूलभूत सुविधांचा अभाव, कच्चे रस्ते आणि मर्यादित संसाधने ही या गावाची वास्तवता असली, तरी सामाजिक जाणीव आणि मानवतेच्या मूल्यांमध्ये हे गाव समृद्ध असल्याचे अवयवदान जनजागृतीच्या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.

‘अनेक वर्षांपासून रूढ झालेल्या समजुती, परंपरा आणि अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करून त्यांचे समुपदेशन करणे हे मानसशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक काम होते. मात्र, शाळेने सातत्याने केलेली जनजागृती, संवाद आणि समुपदेशनामुळे पालकांच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडू लागला आहे. या उपक्रमाला आता बहुतांश पालकांनी प्रतिसाद नोंदवला आहे,’ अशी प्रतिक्रिया अवयवदान समुपदेशक अविनाश काशीद यांनी दिली.

समाजात अवयवदानाबद्दल गैरसमज आहेत. ते दूर करणे गरजेचे आहे. आज कित्येक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत आणि कित्येक रुग्ण अवयव न मिळाल्याने प्राणाला मुकत आहेत. आपण केलेल्या अवयवदानामुळे कित्येकांना नवीन आयुष्य मिळू शकते. जयराम स्वामी विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अवयवदान जनजागृतीचे महत्त्व समजावे यासाठी हा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती जयराम स्वामी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जयवंत घार्गे यांनी दिली.

जास्तीत जास्त युवा वर्गाने अवयवदान नोंदणी व जनजागृती साठी पुढे आले पाहिजे,जर कुटुंबातील एखादा मध्यमवयीन व्यक्ती जर मेंदू मृत व्यक्ती असेल तर त्याच्या अवयवदान संमत्ती पत्रावर त्यांची तरुण पिढीच सही करणार आहे. सर्वप्रथम युवा पिढी जागरुक झाली पाहिजे, शासनस्तरावरही मोठ्या प्रमाणात अवयवदान जनजागृती केली जात असून, शस्त्रक्रिया व उपचारांसाठीसुद्धा मदत मिळत आहे. असे अवयव दान समुपदेशक अविनाश काशीद यांनी नमूद केले.

या शाळेतील माजी विद्यार्थिनी आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त निशा वाघमोडे यांनीही अवयव जाण्याचा निर्धार केला असून शैक्षणिक साक्षरतेप्रमाणेच शंभर टक्के अवयवदान साक्षरता सुद्धा आपल्याला साध्य करायची असून त्याचीच एक छान सुरुवात उपक्रमशील शाळा जयराम स्वामी विद्यामंदिरातून होत असल्याची भावना व्यक्त केली.