पुणे : भौतिकशास्त्रापासून खगोलशास्त्रापर्यंत, वनस्पतीशास्त्रापासून हवामानशास्त्रापर्यंतचे विज्ञान जाणून घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. विज्ञान दिनानिमित्त (२८ फेब्रुवारी) शहरातील विविध वैज्ञानिक संस्थांतर्फे खुला दिवस, शास्त्रज्ञांशी संवाद, व्याख्याने, प्रात्यक्षिके असे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षकांना या उपक्रमांमध्ये सहभागी होता येणार आहे.

आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोलभौतिकी केंद्रातर्फे (आयुका) विज्ञान दिनी सकाळी दहा ते सायंकाळी पाच असा खुला दिवस असणार आहे. या निमित्ताने आयुकातील अद्ययावत संशोधन सुविधा, संशोधन पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच लायगो, ॲस्ट्रोसॅट, टीएमटी अशा महाप्रकल्पांची प्रारुपे मांडून त्या विषयी माहिती दिली जाणार आहे. मान्यवर शास्त्रज्ञांशी संवाद साधता येणार आहे. प्रात्यक्षिके, प्रदर्शन, कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातर्फे (एनसीआरए) २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी नारायणगाव तालुक्यातील खोडद येथे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विज्ञान प्रदर्शनात शाळा आणि महाविद्यालयांचे २२५हून अधिक प्रकल्प मांडण्यात येणार आहेत. या वेळी विविध वैज्ञानिक प्रयोग, लघुपट दाखण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी विद्यार्थी, विज्ञानप्रेमींना ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ ही दुर्बिण पाहता येणार आहे. शास्त्रज्ञांनी संवाद साधता येणार असल्याची माहिती ‘एनसीआरए’चे प्रशासकीय अधिकारी ए. बी. जोंधळे यांनी दिली.

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतर्फे (आयसर पुणे) विज्ञान दिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने विज्ञान दिनासाठी ‘विज्ञानातील महिला : विकसित भारतासाठी प्रेरक शक्ती’ ही संकल्पना जाहीर केली आहे. या संकल्पनेनुसार मान्यवर महिला शास्त्रज्ञांची व्याख्याने, ज्येष्ठ विज्ञान प्रसारक अरविंद गुप्ता यांचे ‘छोटी खेळणी- मोठे विज्ञान’ आणि शिक्षणातील नवोपक्रम या विषयावर विशेष प्रात्यक्षिक व्याख्यान, तसेच वैज्ञानिक प्रात्यक्षिके, वैज्ञानिक खेळण्यांची प्रात्यक्षिके, तथाकथित ‘चमत्कारांमागील विज्ञान’ या विषयावरील सत्रे, आयसर पुणेतील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रारुपांचे प्रदर्शन, आकाश दर्शन, विज्ञान प्रश्नमंजुषा असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटरच्या यूट्यूब वाहिनीवर ‘विश्वाची रहस्ये’ या विषयावरील ऑनलाइन प्रश्नमंजुषा होणार असल्याची माहिती आयसर पुणेतर्फे देण्यात आली.

सावित्रीाबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्रातर्फे वैज्ञानिक प्रतिकृती आणि प्रयोगांचे प्रदर्शन सकाळी अकरा ते चार या वेळेत खुले राहणार आहे. त्याशिवाय विज्ञान एकांकिकांचे सादरीकरण, एकपात्री प्रयोगांचे सादरीकरण, गणितीय खेळ, भौतिक आणि रसायनशास्त्राची प्रात्यक्षिके, रक्ताभिसरण आणि जागतिक तापमानबदल असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी सात ते नऊ या वेळेत आकाशदर्शन, या कार्यक्रमाला शास्त्रज्ञ डॉ. प्रियदर्शिनी कर्वे, सुप्रिया बर्वे उपस्थित राहणार आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेतर्फे (सिमला ऑफिस) हवामानशास्त्रीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाद्वारे हवामानशास्त्र, हवामानशास्त्रीय निरीक्षणे, भूकंप वेधशाळा, अंटार्क्टिका मोहीम या विषयीची माहिती दिली जाणार आहे. तसेच शास्त्रज्ञांशी संवाद साधता येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच या वेळेत खुले राहणार असल्याची माहिती हवामान संशोधन आणि सेवा केंद्राचे शास्त्रज्ञ यु. के. शेंडे यांनी दिली. तसेच भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतर्फे शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) खुला दिवस आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत संस्थेतील संशोधन सुविधा, विविध संशोधनाची माहिती दिली जाणार आहे.