सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या नाटकांची सर्वागीण चिकित्सा करणारे राष्ट्रीय चर्चासत्र २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
सतीश आळेकर यांच्या ‘महानिर्वाण’ नाटकाला चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेक अंगाने बहुचर्चित आणि अनेक पारितोषिके प्राप्त करणाऱ्या या नाटकाकडे मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान म्हणून पाहिले जाते. त्यांच्या इतरही नाटकांनी मराठी नाटय़वाङ्मयाचा इतिहास समृद्ध केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे आळेकर यांच्या नाटकांची सर्वागीण चिकित्सा करणारे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले आहे. खेर वाङ्मय सभागृहाच्या संत नामदेव सभागृह येथे हे चर्चासत्र होणार आहे.
चित्रपट दिग्दर्शक अरुण खोपकर यांच्या हस्ते २९ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता या चर्चासत्राचे उद्घाटन होणार असून त्यांचे बीजभाषण होणार आहे. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. ‘सतीश आळेकरांचा नाटय़प्रवास’ या विषयावर समर नखाते यांचे आणि ‘आळेकरांच्या नाटकातील आशयाची प्रयोगशीलता’ या विषयावर प्रा. अविनाश सप्रे बोलणार असून नाटककार प्रा. दत्ता भगत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. ‘आळेकरांच्या नाटकातील सामाजिक जाणिवा’ या विषयावर डॉ. संजयकुमार करंदीकर आणि ‘आळेकरांची नाटके : सांस्कृतिक आकलन’ या विषयावर डॉ. अनिल सकपाळ बोलणार असून नाटय़दिग्दर्शक अतुल पेठे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. ‘आळेकरांच्या नाटकातील प्रयोगशीलता’ या विषयावर प्रा. प्रवीण भोळे, ‘आळेकर आणि समकालीन नाटककार’ या विषयावर धर्मकीर्ती सुमंत बोलणार असून नाटककार मकरंद साठे अध्यक्षस्थानी असतील. अतुल पेठे दिग्दर्शित ‘नाटककार सतीश आळेकर’ हा माहितीपट दाखविला जाणार आहे.
‘आळेकरांच्या नाटकातील मिथके’ यावर डॉ. संजय मेस्त्री, ‘आळेकरांच्या नाटकातील आदिबंध’ या विषयावर डॉ. पुष्पा राजापुरे-तापस या ३० जानेवारी रोजी बोलणार असून डॉ. नागनाथ कोत्तापल्ले या सत्राचे अध्यक्ष असतील. ‘आळेकरांच्या नाटकातील स्त्रीव्यक्तिरेखा’ आणि आणि ‘नाटकातील स्त्री-पुरुष संबंध’ या विषयावर प्रा. माधुरी दीक्षित आणि प्रा. ऊर्मिला भिर्डीकर बोलणार असून डॉ. शोभा देशमुख अध्यक्षस्थानी असतील. ‘आळेकरांची नाटय़शैली’ आणि ‘नाटकांची भाषा’ या विषयावर अनुक्रमे डॉ. हिमांशू स्मार्त आणि प्रा. विजय तापस बोलणार असून शिरीष गोपाळ देशपांडे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. दुपारच्या सत्रात डॉ. रेखा इनामदार-साने आणि वैभव आबनावे हे प्रा. सतीश आळेकर यांच्याशी संवाद साधणार आहेत. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘एक दिवस मठाकडे’ या आळेकरांच्या नाटकाचा प्रयोग होणार आहे.
‘आळेकरांच्या नाटकातील विनोद’ विषयावर मुकुंद टाकसाळे, ‘नाटय़शिक्षण आणि आळेकरांची नाटके’ या विषयावर डॉ. आशुतोष पोतदार ३१ जानेवारी रोजी बोलणार असून डॉ. सुधीर तडकोडकर अध्यक्ष असतील. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या उपस्थितीत या चर्चासत्राचा समारोप होणार असल्याचे विभागप्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी कळविले आहे.