पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) २६ व्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली येत्या मंगळवारी (१० जून) बालगंधर्व रंगमंदिर येथे मेळावा होणार असून, यानिमित्ताने आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू होणार आहे.
पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी (१० जून) सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे ध्वजारोहण होईल. यानंतर सकाळी साडेदहा ते दोन यावेळेत बालगंधर्व येथे मेळावा होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, ॲड. जयदेव गायकवाड, रवींद्र माळवदकर, श्रीकांत पाटील, विशाल तांबे, औदुंबर खुने पाटील, उदय महाले, किशोर कांबळे, सुनील माने या वेळी उपस्थित होते.
जगताप म्हणाले, ‘वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला पक्षाध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सर्व खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या २६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पुणे शहराला वर्धापनदिनाच्या यजमान पदाचा मान मिळाला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात साजरा होत असलेला हा वर्धापनदिन पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देणारा, पक्षाला ताकद देणारा ठरणार आहे.’