scorecardresearch

शहरबात पिंपरी : राष्ट्रवादीतील मरगळ दूर करण्याचा निर्धार

दारुण पराभवामुळे मरगळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सांगवी येथे मेळावा झाला

शहरबात पिंपरी : राष्ट्रवादीतील मरगळ दूर करण्याचा निर्धार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगवीतील मेळाव्यात नेत्यांच्या मुलांना संघटनात्मक पदे देऊन त्यांना सक्रिय करण्यात आले.

दारुण पराभवामुळे मरगळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सांगवी येथे मेळावा झाला. भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याबरोबरच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला. पिंपरी-चिंचवडकरांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा करणाऱ्या महापालिकेला तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. कारण, पुरेसे पाणी देताना पाणीपुरवठा विभागाची दमछाक होऊ लागली आहे. शहरातील प्रत्येक भागात पाण्याविषयी वाढत्या तक्रारी आहेत. मात्र, त्यांचे निवारण करण्यात प्रशासनाला सातत्याने अपयश येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. शहरातील तोडफोडीचे सत्र सुरूच असल्याने पोलीसही हतबल झाले आहेत.

पिंपरी महापालिकेच्या रणसंग्रामात भारतीय जनता पक्षाने बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी काँग्रेसला भुईसपाट केले. तेव्हापासून घायकुतीला आलेला राष्ट्रवादी पक्ष अद्याप पराभवातून बाहेर पडलेली नाही. सांगवीत मेळावा झाला, तेव्हा महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनीच दांडी मारली. नव्या-जुन्यांचा सहभाग असलेल्या या मेळाव्याच्या माध्यमातून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये जान आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. मात्र, तो तितका दमदार नव्हता. आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर केवळ पिंपरी-चिंचवड नव्हे तर राज्यभरात भाजपशी दोन हात करण्याचा निर्धार व्यक्त करतानाच अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्रामसिंह कोते पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, श्याम लांडे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, वर्षां जगताप, सुनील गव्हाणे, विशाल काळभोर हे पदाधिकारी उपस्थित होते. या निमित्ताने हर्षवर्धन भोईर, कुणाल थोपटे, प्रतीक साळुंके, सागर तापकीर, शेखर काटे, विशाल पवार अशा राष्ट्रवादी नेत्यांच्या पुढील पिढीला संघटनात्मक पदे देऊन सक्रि य करण्यात आले. १५ वर्षांच्या सत्ताकाळात राष्ट्रवादीने पिंपरी महापालिकेची तिजोरी रिकामी केल्याचा आरोप करत भाजपने राष्ट्रवादीला बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र, पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या भाजपने नऊ महिन्यांतच राष्ट्रवादीच्या पुढची पायरी गाठली असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीचे ३८ नगरसेवक असूनही ते मूग गिळून गप्प बसतात, अशी खंत कार्यकर्त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली.

भाजप आणि राष्ट्रवादीच्या ठरावीक नेत्यांचा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ असा एकत्रित कारभार सुरू असल्याचे सूचक भाष्य या वेळी करण्यात आले.

पाणीपुरवठा विभागाचा नियोजनशून्य कारभार

पिंपरी-चिंचवड शहराला आठवडय़ाचे सातही दिवस २४ तास पाणीपुरवठा करण्याची महापालिकेची योजना आहे. आठ वर्षांपूर्वीच याबाबतची घोषणा झाली होती. तेव्हापासून केवळ ‘कागदी घोडे’ नाचवण्याचे काम सुरू आहे. अजून तरी ती योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. शहरातील जवळपास सर्वच भागात पाण्याविषयी विविध प्रकारच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी पाणी पोहोचत नाही. काही ठिकाणी अवेळी तर काही ठिकाणी अपुरे पाणी मिळते. कासारवाडी-फुगेवाडी-दापोडी प्रभागातील नागरिकांनी सततच्या पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक राजू बनसोडे, माई काटे यांच्या नेतृत्वाखाली पुणे-मुंबई महामार्गावर नुकतेच रास्ता रोको आंदोलन केले. उपमहापौर शैलजा मोरे यांनी प्राधिकरण प्रभागातील पाणीटंचाईवरून आंदोलनाचा इशारा देत सत्ताधाऱ्यांना घरचा अहेर दिला आहे. खराळवाडी भागात रात्री दीड आणि अडीच वाजता पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याच्या मानसिकतेत या भागातील नागरिक आले आहेत. विस्कळीत आणि नियोजनशून्य कारभार हे पाणीपुरवठा विभागाचे वैशिष्टय़ असून नकारात्मक दृष्टिकोन असलेले अधिकारी या विभागात आहेत. २४ तास पाणी द्या, अशी मागणी कधीही कोणीही केली नाही. मात्र, तरीही ती घोषणा करण्यात आली, त्यामध्ये अनेकांची वेगवेगळी आर्थिक गणिते होती आणि आहेत. २४ तास पाणी राहू द्यात, दररोज अपेक्षित असलेले पुरेसे पाणीही वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. त्याचे अधिकारी व पदाधिकारी कोणालाही सोयरसुतक नाही.

वाहनांच्या तोडफोडीचे सत्र

पिंपरी-चिंचवड शहरातील तोडफोडीचे सत्र काही केल्या थांबण्याची चिन्हे नाहीत. सोमवारी थेरगाव तसेच संत तुकारामगर येथे रस्त्यावर लावलेल्या १७ वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर, मंगळवारी दुसऱ्याच दिवशी चिंचवडच्या रामनगर भागात आठ वाहनांची तोडफाड झाली. गेल्या दोन वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरातील जवळपास प्रत्येक भागात तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी, काळेवाडी, चिंचवड, मोहननगर, थेरगाव, निगडी, काळभोरनगर, पिंपरी, नेहरूनगर, गांधीनगर अशा विविध भागात हे तोडफोड नाटय़ घडले आहे. गुन्हेगार मोकाट असून पोलीस हतबल असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. अल्पवयीन आरोपी तसेच मद्यधुंद टोळके मिळेल त्या हत्याराने वाहनांची तोडफाड आणि जाळपोळ करतात, असे या घटनांमधून दिसून येते. पिंपरी महापालिकेच्या रस्त्यांची तसेच पदपथांची कामे जागोजागी सुरू आहेत. अशाप्रकारची तोडफोड करताना तेथील सिमेंटचे ठोकळे वापरण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस निश्चितपणे कारवाई करतात. मात्र, प्रत्येक घटनेत नवे आरोपी आढळून येत आहेत. काही ठिकाणी राजकीय दबाव आहे. तर, अनेक प्रकरणात पोलिसांची लाचखोर प्रवृत्ती दिसून येते, असे बोलले जाते. तोडफोड करताना कोणालाही कशाचीही भीती वाटत नाही. पोलिसांचा दरारा राहिला नाही. दंगेखोरांना पाठिशी घालण्याचे धोरण अंगाशी येऊ शकते, याचे भान राज्यकर्त्यांना व लोकप्रतिनिधींना ठेवावे लागणार आहे

बाळासाहेब जवळकर -balasaheb.javalkar@expressindia.com

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2018 at 03:28 IST

संबंधित बातम्या