शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड करत, अगोदर सुरत आणि नंतर गुवाहाटी गाठलं होतं. त्या दरम्यान सांगोलाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला फोन केला व त्यावेळी त्यांनी म्हटलेला “काय तो डोंगार, काय ती झाडी, काय ते हॉटेल…” हा संवाद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

असाच काहीसा डायलॉग म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईवरून सरकारवर टीका केली.
“अरे काय तो सिलिंडर, काय ती महागाई, काय ते सरकार, सगळचं नॉट ओके..” असं म्हणत आंदोलक महिला कार्यकर्त्यांनी महागाईवरून सरकारवर निशाणा साधला. पुण्यात कायम पाऊस सुरू आहे, अशावेळी भर पावसात या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा मृणालिनी वाणी, वैशाली नागवडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थिती होत्या.

पाहा व्हिडीओ –

ते पैसे वसुल करण्यासाठी तर ही गॅस दर वाढ केलेली नसावी ना? –

“ केंद्र सरकारमार्फत मागील सात वर्षांपासून सतत दरवाढ केली जात आहे. यामुळे सर्वासामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. परंतु या सरकारला काही देणेघणे नाही, त्यांना केवळ उद्योगपतींचीच काळजी आहे. त्यांना सबसिडी दिली जाते, मात्र सर्वसामान्यांना कोणतीही सबसिडी दिली जात नाही. ही निषेधार्ह बाब असून आता या सरकारने गॅस दरात पुन्हा वाढ करून जनतेला आणखी महागाईमध्ये ओढण्याचं काम केलं आहे. तसेच, आता भाजपा आणि बंडखोर आमदरांचं सरकार आलं आहे. त्या बंडखोर आमदारांना प्रत्येकी ५० कोटी दिले गेले आहेत, त्यामुळे ते पैसे वसुल करण्यासाठी तर ही गॅस दर वाढ केलेली नसावी ना?” अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी टीका केली.